पुणे : गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. दीड दिवसांच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन घाटांवर येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गणेशमूर्तींचे विसर्जन, निर्माल्य संकलन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेवर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. भाविकांनी नैसर्गिक जलस्रोतांऐवजी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन हौदांचा वापर ‘श्रीं’चे विसर्जनासाठी करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक ती तयारी महापालिकेने केली आहे. शहरात गणेशमूर्तींचे विसर्जन दीड दिवस, पाचवा, सातवा दिवस तसेच अनंत चतुर्दशीला केले जाते. या विसर्जनाच्या दिवसांमध्ये विसर्जन घाटांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन केले आहे. विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, निर्माल्य संकलन केंद्रे, मूर्ती संकलनाची व्यवस्था प्रत्येक घाटावर करण्यात आली आहे.

विसर्जनाच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. गणेशोत्सवातील गर्दीचे नियोजन करतानाच पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत.

गेल्या वर्षी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून शाडू माती संकलित करून तिचा पुनर्वापर केला. गेल्या वर्षी २०२५ मध्ये सुमारे ३९ टन शाडू माती संकलित करण्यात आली. तसेच, निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मितीचा उपक्रमदेखील राबविण्यात आला. गेल्या वर्षी गणेशोत्सवात महापालिकेने बांधलेल्या हौदांमध्ये १ लाख १३ हजार १३६ मूर्ती, लोखंडी टाक्यांमध्ये ३ लाख ६२ हजार ३१९ मूर्ती, तर १ लाख ७८ हजार ९५५ ‘श्रीं’ च्या मूर्ती संकलन केंद्रांवर विसर्जित करण्यात आल्या. अशा एकूण ६ लाख ५४ हजार ४१० गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. तर ९ लाख २३ हजार ३९८ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले.

घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे म्हणाले, गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी आवश्यक ती तयारी महापालिकेने केली आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. घाटांवर ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. नागरिकांनी गणरायाला निरोप देताना महापालिकेला सहकार्य करावे. पाण्यात उतरणे टाळावे. घाटांवरील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

महापालिकेची ही तयारी पूर्ण….

  • नदीपात्रांमध्ये ३७ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था
  • शहरातील विविध ३५ घाटांवर विसर्जनाची सोय
  • शहरातील ३८ ठिकाणी ६९ कृत्रिम हौदांची व्यवस्था
  • २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्यांची सोय
  • ४ तलाव, ७ विहिरींमध्ये विसर्जन व्यवस्था
  • कॅनॉलवर ४१ ठिकाणी होणार विसर्जन
  • निर्माल्य कलश/कंटेनर : २७४ ठिकाणी, ३२८ कलश
  • मूर्तिसंकलन/दानकेंद्रे : २४१