पुणे : पुणे शहरातील रुग्णालये, खासगी वसतिगृहे आणि खासगी क्लासेसचे फायर ऑडिट करण्यास महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सुरुवात केली आहे. या तपासणी मोहिमेत काही ठिकाणी त्रुटी आढळल्याने महापालिकेने २१ खासगी वसतिगृहांना टाळे ठोकले. नवी दिल्लीमधील वसतिगृहाची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने ही मोहीम सुरू करण्यात आली.

महापालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत अग्निसुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसलेल्या आणि महापालिकेची आवश्यक परवानगी न घेतलेल्या २१ वसतिगृहांवर कारवाई करून सील ठोकण्यात आले. लोहगाव, निंबाळकरनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. तसेच नऱ्हे, आंबेगाव, कात्रज यासह शहरातील विविध भागात ही तपासणी सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

महापालिकेच्या पथकांनी गेल्या तीन दिवसांपासून शहरातील विविध भागातील वसतिगृहांची पाहणी केली. या भागात असलेल्या तीन ते चार मजली इमारतींमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी राहत असल्याचे समोर आले. मात्र, या ठिकाणी स्थायी किंवा अस्थायी स्वरुपाची अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याचे महापालिकेने केलेल्या तपासणीत समोर आले. अशा परिस्थितीत आग लागल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली.

ही वसतिगृहे चालविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ‘फायर ऑडिट’ करून घेणे आवश्यक आहे. या बाबतच्या सूचना यापूर्वीच महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व खासगी वसतिगृहे आणि क्लासना दिल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करून वसतिगृहे सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

महापालिका प्रशासनाने केलेल्या पाहणीत संबधित बांधकामांसाठी महापालिकेच्या बांधकाम खात्याच्या विविध परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. सांडपाणी, उद्यान विभाग, मिळकतकर विभाग आणि अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) यापैकी कोणतीही परवानगी उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘महाविद्यालयांच्या भूमिकेचीही चौकशी करणार’

महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या तपासणीदरम्यान तेथे राहत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या वेळी या भागातील काही महाविद्यालयांकडून संबंधित वसतिगृहांचे संदर्भ दिले जात असल्याची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना वसतिगृह राहण्यासाठी देताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जागामालकांसह अशा अनधिकृत निवासव्यवस्थेचे संदर्भ देणाऱ्यांविरोधातदेखील नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यामध्ये कोणाचीही हयगय केली जाणार नसल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांचीही तपासणी

‘शहरातील विविध भागांमध्ये महापालिका अग्निशमन विभागाकडून शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, रुग्णालये आणि अन्य आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. अग्निसुरक्षेची यंत्रणा नसणे किंवा ती सुस्थितीत ठेवली नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांनी अग्निशमन यंत्रणा कार्यरत व सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी,’ असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अग्निशमन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने म्हणाले, महापालिकेने ‘फायर ऑडिट’ तपासणीचे काम सुरू केले आहे. नियमांचा भंग करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करू. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार, ही मोहीम सुरू केली आहे.