पुणे : पादचाऱ्यांना अडथळा मुक्त चालता यावे यासाठी गेल्या पाच वर्षापूर्वी मोठ्या उत्साहाने सुरू केलेल्या पादचारी दिनाचा यंदा महापालिकेला विसर पडला आहे. दरवर्षी ११ डिसेंबर हा दिवस पुणे महापालिकेच्या वतीने पादचारी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शहरातील रहदारीचा रस्ता अशी ओळख असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पादचाऱ्यांना रस्त्यावरून सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी गेल्या पाच वर्षांपूर्वी पुणे महापालिकेने पादचारी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गेल्या चार वर्षांपासून ११ डिसेंबरला विविध कार्यक्रम घेतले जातात. या दिवशी लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या वाहनांना ये जा करून दिली जात नाही. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्त्याने चालण्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने ११ डिसेंबरला लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जातो.
पादचारी दिन असलेल्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक सकाळी अकरा ते दुपारी चार या कालावधीत वाहनमुक्त ठेवण्यात येतात. या ठिकाणी वाॅकिंग प्लाझासह स्थानिक गटांच्या सहकार्याने लक्ष्मी रस्त्यावर मनोरंजक आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात येतात. महापालिकेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असतो.
पादचारी दिन साजरा करणारी पुणे ही देशातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे. त्यानुसार महापालिकेकडून दरवर्षी अकरा डिसेंबर रोजी पादचारी दिन उपक्रम राबविला जातो. यंदा ११ डिसेंबर उद्या गुरुवारी आहे. मात्र महापालिकेला पादचारी दिनाचा विसर पडल्याने लक्ष्मी रस्त्यावर या वर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दरवर्षी ११ डिसेंबरला वाहतुकीसाठी बंद असलेला लक्ष्मी रस्ता यंदा सुरू राहणार आहे.
पादचाऱ्यांना मुक्तपणे संचार करता यावा, वाहनांमुळे होणारी कोंडी आणि प्रदूषण कमी व्हावे तसेच पादचारी मार्ग, सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्राॅसिंगसह अन्य पूरक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जातो वाहनांचा वाढता वापर नियंत्रित करण्यासाठीही या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते, असे दरवर्षी महापालिका प्रशासन सांगत असते. मग यंदाच्या वर्षी हे सगळे प्रश्न सुटले आहेत का? म्हणून महापालिका प्रशासनाने हा उपक्रम बंद केला आहे? अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.
याबाबत महापालिकेच्या पथ विभागाची प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, पादचारी दिन यांना वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न आहे. शहरातील विविध भागातील पदपथांची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या माध्यमातून व्यापक उपक्रम घेण्याचे नियोजन आहे.
