पुणे : देशभरात जुन्या मोटारींची बाजारपेठ विस्तारत आहे. पुण्यातही आता जुन्या मोटारींना मागणी वाढू लागली आहे. विशेषत: शहरांतर्गत प्रवासासाठी तरुणांकडून जुन्या मोटारींना पसंती मिळत आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून जुन्या मोटारींसाठी अर्थसहाय्य मिळत असल्याने त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

पुण्यात वाहतुकीच्या साधनांचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. पायाभूत सुविधांच्या वाढीमुळे शहराच्या आर्थिक विकासाला गती मिळत आहे. त्यातून खासगी वाहनांची मागणी वाढली आहे. तरुणांकडून नवीन मोटार खरेदी करण्याऐवजी जुन्या मोटारीला पसंती मिळत आहे. त्यातही आलिशान मोटारींपेक्षा छोट्या मोटारींना प्राधान्य दिले जात आहे. पूर्वी जुन्या मोटारीच्या खरेदीसाठी कर्ज मिळणे अवघड होते. आता अनेक बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्या कर्ज देत असल्याने जुन्या मोटारींची खरेदी सोपी झाली आहे. जुनी मोटार घेणाऱ्या ग्राहकांपैकी ५९ टक्के कर्जावर तिची खरेदी करीत आहेत. त्यामुळे मोटारीच्या खरेदीसाठी एकरकमी पैसे गुंतविणे त्यांना टाळता येत आहे.

आणखी वाचा-पुणे : गंगाधाम चौकातील अपघात; संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता…

जुन्या मोटारींच्या बाजारपेठेत ‘कार्स २४’ कंपनी कार्यरत आहे. या कंपनीने मोटार खरेदीसाठी कर्ज देण्यासाठी ‘कार्स २४ फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ (सीएफएसपीएल) ही कंपनी सुरू केली आहे. याबाबत ‘कार्स २४’चे सहसंस्थापक गजेंद्र जांगीड म्हणाले की, ‘सीएफएसपीएल’च्या कर्ज वितरणात वार्षिक ३० टक्के वाढ झाली आहे. जुन्या मोटारीच्या खरेदीसाठी कर्ज घेणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. सरासरी वयोगट पाहता ३४ वर्षांच्या व्यक्ती हे कर्ज घेत आहेत. दैनंदिन प्रवासासाठी तरुणांकडून जुन्या मोटारींना प्राधान्य दिले जात आहे.

आणखी वाचा-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ, तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील घटना

सर्वाधिक पसंती कशाला?

पुणेकरांची सर्वाधिक पसंती वॅगन-आर, स्विफ्ट आणि ह्युंदाई-ग्रँड आय १० या मोटारींना आहे. या मोटारी आकाराने छोट्या असून, त्या परवडणाऱ्या, कार्यक्षम आहेत. या मोटारींची रचना आणि अत्याधुनिक वैशिष्ट्ये यामुळेही त्यांना मागणी अधिक आहे. या मोटारींचा इंधन खर्च कमी असल्याने त्या परवडणाऱ्या ठरत आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या जागेची टंचाई या स्थितीत छोट्या आकाराच्या मोटारी अधिक सोयीच्या ठरत आहेत.