पुणे : शहरातील मुख्य रस्ते आणि उपनगरातील पेट्रोल पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांच्या रविवारी (१ मार्च) मध्यरात्री बाराच्या सुमारास लांबच लांब रांगा लागल्या. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढणार आणि मध्यरात्रीपासूनच देशातील पेट्रोल-डिझेल महागणार, या चर्चेने पुणेकरांमध्ये खळबळ उडाली. मात्र, ‘आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होणार, या केवळ अफवा आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसतो. देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही. अजून काही महिने पुरेल, इतका तेलसाठा देशात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लाऊ नयेत,’ असे आवाहन ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.
परिस्थिती काय?
‘रविवारी रात्री सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला. त्यात मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाला असून, आज रात्री बारा पासूनच पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे ५ ते १० रुपयांनी मोठी वाढ होणार आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे आत्ता गाडी फुल्ल करून घ्यायची आहे,’ अशी प्रतिक्रिया नळ स्टॉप जवळच्या एका पेट्रोल पंपावर मध्यरात्री पेट्रोल भरायला रांगेत उभ्या राहिलेल्या एकाने दिली. अशा प्रकाराच्या चर्चेमुळे नागरिकांनी आपापल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या घेऊन थेट पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याचे दिसून आले. रविवारी आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यात सोमवारी कामाच्या पहिल्या दिवशी घाई नको म्हणून, मध्यमवर्गानेही रविवारी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या.
शहरातील काही भागात मध्यरात्री सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले. आपला नंबर आधी यावा, म्हणून घाई करणाऱ्या वाहनचालकांमध्ये काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रसंगही घडल्याचे दिसून आले. ‘मी एका तासापासून रांगेत उभा आहे. उद्या पेट्रोल महाग होणार असं ऐकलं, म्हणून गाडी फुल्ल करून घेतोय,’ अशी प्रतिक्रिया एका त्रस्त नागरिकाने व्यक्त केली.
सध्या पेट्रोल, डिझेलचे दर किती ?
सध्या पुण्यात पेट्रोल सुमारे १०४ ते १०६ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९० ते ९२ रुपये प्रति लिटरच्या दराने मिळत आहे. दरम्यान, नव्या नियमांनुसार या किमती दररोज बदलतात.
‘पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ नाही’
केंद्र सरकार किंवा पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘इराण-इस्रायल युद्धामुळे आखाती देशांतून पेट्रोलची आयात करता येणार नाही. त्यामुळे देशातील पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढतील, अशा प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला दिसतो. मात्र, असे काहीही होणार नाही. आखाती देशांमधून कच्च्या तेलाचा पुरवठा झाला नाही, तरी देशातील तेलपुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम होणार नाही. रशियाकडून होणारा तेलपुरवठा अद्याप सुरक्षित आहे. तसेच कित्येक महिने पुरेल इतका तेलसाठा आपल्या देशात आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नयेत,’ असे आवाहन ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारूवाला यांनी केले आहे.
