पुणे : पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भडका उडाला आहे. यामुळे देशभरात पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. या परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी हा पर्याय कमी किमतीमुळे वाहनचालकांना अधिक परवडणारा ठरत आहे. त्यामुळे त्याकडे वाहनचालकांचा ओढा वाढू लागला आहे. परंतु आता सीएनजीही मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. अनेक पंपावर सीएनजीसाठी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्रही निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीएनजी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडसह आजूबाजूच्या परिसरात अनेक सीएनजी पंपावर कमी दाबाने पुरवठा होत आहे. यामुळे वाहनचालकांना सीएनजी वितरण करताना पंपचालकांना अडचणी येत आहेत. अनेक वेळा वितरण बंद ठेवावे लागत आहे. यामुळे पंपावर लांबचलांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. या लांब रांगा अनेक रस्त्यांवर दिसून येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
पंपचालकांचे म्हणणे काय?
या पार्श्वभूमीवर पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे या संघटनेने महानगर गॅस लिमिटेडला ( एमएनजीएल) पत्र पाठवून तातडीने सीएनजी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. याविषयी संघटनेचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल म्हणाले की, ‘एमएनजीएल’कडून पंपांना सीएनजी पुरवठा कमी दाबाने होत आहे. महिनाभरापासून ही परिस्थिती कायम आहे. सीएनजी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने त्याचे वितरण करताना पंपावरील कॉम्प्रेसरवर ताण येतो. यातून कॉम्प्रेसर खराब होणे अथवा बंद पडणे असे प्रकार घडतात. यामुळे पंपावरील सीएनजी वितरण बंद ठेवावे लागते. यातून पंपावर सीएनजी भरण्यासाठी आलेल्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. या मुद्द्यावर अनेक वेळा ग्राहकांकडून पंपावरील कर्मचाऱ्यांना नाहक धारेवर धरले जाते. हे एवढ्यावरच न थांबता स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून पंपावर कारवाई केली जात आहे. या समस्येमुळे पंपचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे सीएनजी पुरवठा तातडीने पुरेशा दाबाने सुरळीत करावा.
‘एमएनजीएल’चे उत्तर काय?
यावर ‘एमएनजीएल’ने म्हटले आहे की, पावसाळ्यात दरवर्षी सीएनजीची मागणी तुलनेने वाढते. कारण मोटारींचा वापर या कालावधीत जास्त केला जातो. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात नवीन ११ सीएनजी पंप सुरू करण्यात आले आहेत. याचबरोबर चालू आर्थिक वर्षात आणखी ९ पंप सुरू करण्याचे नियोजन आहे. सीएनजीची मागणी वाढत असताना त्याचे वितरण जाळे सक्षम करण्यासोबत त्याचा पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी तळेगावमध्ये अतिरिक्त गॅस वाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात सीएनजी पुरवठा पुरेशा दाबाने आणि अखंडितपणे होणार आहे.
