पुणे : शहराच्या विकासासाठी केंद्रात सत्ताधारी असलेले नरेंद्र मोदी सरकार तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेले महायुती सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी देते. मात्र शहरातील भाजपचे स्थानिक नेतृत्व कामे करत नाहीत. असा आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या निवडणुकीत जोरदार प्रचार केला. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे चित्र निकालातून दिसून आले.
महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविण्यात आल्यानंतरही पुणेकरांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने ‘राष्ट्रवादी’च्या घड्याळाला धोक्याचा ‘अलार्म’ लागला आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पंधरा दिवसांमध्ये अत्यंत जोमाने प्रचार करणारे उपमुख्यमंत्री, आणि पालकमंत्री अजित पवार यांचे पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्यास फटका बसण्याच्या शक्यतेने भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा भाजपला झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा फटका महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांना बसू नये, आणि मतांचे विभाजन होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला बरोबर घेऊन निवडणूक लढविली. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे हा निकाल दोन्ही ‘राष्ट्रवादी’साठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळविला होता. मात्र, या जागा ताब्यात ठेवण्यात ‘राष्ट्रवादी’ला अपयश आले. भाजपच्या विरोधात अनेक प्रभागांमध्ये निवडणूक लढविणाऱ्या ‘राष्ट्रवादी’च्या जागा निवडणुकीत घटल्या आहेत. काही प्रभागांमध्ये तर अत्यंत कमी मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आपले उमेदवार निवडून आणण्यामध्ये यश आले आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ‘राष्ट्रवादी’ची ताकद वाढविण्यासाठी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. महापालिका निवडणुकीत राज्यात महायुतीच्या सत्तेत सहभागी असतानाही स्वबळावर निवडणूक लढविताना एकमेकांवर टीका न करण्याचा अलिखित ठराव भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी केला होता. मात्र, प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पहिले दोन दिवस महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर कोणतीही टीका टीपण्णी केली नाही.
मात्र, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक झाले. त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या कारभारावर टीका करण्यास सुरुवात केली. महापालिकेतील कारभारी बदला, अशी साद मतदारांना घातली. पवार यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांसह राज्य पाचळीवरील नेते देखील त्रस्त झाले. पवार यांनी जाहीर सभा, रॅली काढल्याने वातावरण निर्मिती झाली. त्यामुळे भाजपपुढे आव्हान उभे राहिले.
प्रचाराच्या काळात उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘पाच अलार्म’वर भर दिला. महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर मोफत पीएमपी तसेच मेट्रो सेवा देण्याची हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिली होती. मात्र, पुणेकरांवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. महापालिकेत राष्ट्रवादीला मिळालेल्या जागा लक्षात घेता ‘राष्ट्रवादी’ला धोक्याचा ‘अलार्म’ वाजला आहे.
