पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील विषारी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह साथीदारांविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी मुख्य सूत्रधार दत्ता उर्फ भाऊ लोंढे याच्यासह साथीदार आकाश जाधव, योगेश व्हनकडे, राधेश्याम प्रजापती, कल्पशे अगरवाल, आर्यन धोत्रे, अभिषेक चौबे, अंकित चौेब यांच्याविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली आहे. मिथेनाॅल मिश्रीत गावठी दारू प्यायल्याने पुण्यातील हडपसर भागातील चौघांचा, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी-फुगेवाडी भागातील १७ जण अशा २१ जणांचा मृत्यू झाला होता. लोंढे आणि साथीदारांनी बेकायदा गावठी दारू तयार केली होती. गावठी दारूची साठवणूक, वाहतूक, विक्री करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवला होता. ‘सीआयडी’ने केलेल्या तपासात या प्रकरणातील आरोपींविरुद्ध अशा प्रकारचे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतरही सुधारणा झाली नाही.

या टोळीविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी ‘सीआयडी’ने ‘मकोका’ कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी त्यास मंजुरी दिली. ‘सीआयडी’चे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक शफकत आमन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शामराव काळे आणि पथकाने ही कारवाई केली.

विषारी दारू प्रकरणानंतर दोन ते तीन गुन्हे

विषारी दारू प्रकरणात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील २१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारू विक्री प्रकरणात कारवाई केली. त्यानंतर पुणे शहर परिसरात विषारी रासायनिक पदार्थ मिसळून गावठी दारूविक्रीचे प्रकार उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल केले होते.