पिंपरी : दापोडीतील फुगेवाडी आणि पुण्यातील हडपसर येथील विषारी दारू प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील अवैध दारू धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी एकत्र येत ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. अवैध हातभट्टी, भेसळयुक्त दारू आणि बेकायदेशीर दारू विक्रीच्या संपूर्ण साखळीतील प्रत्येक दुव्यावर थेट संयुक्त प्रहार करण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जून रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ही बैठक पार पडली. अवैध दारूच्या समूळ उच्चाटनासाठी आयोजित बैठकीला सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गिरीष हुकरे, पुण्याचे पोलीस उपायुक्त चिलूमुल्ला रजनीकांत, पिंपरी-चिंचवडचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने भेसळयुक्त दारू, अवैध दारू गाळणे आणि शहरासह ग्रामीण भागात पसरलेल्या अवैध दारू विक्रीच्या जाळ्या उदध्वस्त करण्यावर सविस्तर चर्चा झाली. या तिन्ही क्षेत्रांतील वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी गुप्त माहितीची आपापसात देवाणघेवाण करणे आणि संयुक्तपणे कडक अंमलबजावणी अधिक मजबूत करण्यावर सर्व अधिकाऱ्यांनी एकमत केले. या सर्व विभागांच्या संयुक्त पुढाकारामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात अवैध दारू विक्रेते आणि हातभट्ट्यांवर मोठ्या कारवायांची मालिका पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पोलिसांच्‍या कारवायानंतरही अवैध दारूचे धंदे सुरूच , दहा कारवायांमध्ये लाखो रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त!

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीर दारू विक्री आणि वाहतुकीवर अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या १० ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी लाखो रुपयांची देशी-विदेशी दारू, गावठी हातभट्टी आणि वाहने जप्त केली आहेत.

आळंदीतील च-होली येथे गुन्हे शाखा युनिट तीनच्‍या पथकाने पाच लाख रुपये किमतीच्या मोटारीसह २२ हजार ५ रुपयांची विदेशी दारू जप्त करत एकाला ताब्यात घेतले. नाणेकरवाडी येथे स्कुटीवरून ३२ हजार रुपयांच्या देशी दारूची वाहतूक करताना एकाला दक्षिण चाकण पोलिसांनी पकडले. तसेच, रावेत परिसरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोपेड दुचाकीवरून बिअरची वाहतूक करणाऱ्या दोघांना रावेत पोलिसांनी रंगेहात पकडले.

तळवडे येथील ५२ हजार ६९० रुपयांच्या देशी-विदेशी दारूसह देहूरोड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. म्हाळुंगे येथील ‘चायनीज सेंटर’मध्ये १० हजार २२० रुपयांची विदेशी दारू विकणाऱ्यावर उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चिंचवड येथील ‘बिअर शॉपी’मध्ये सहा हजार ६८० रुपयांच्या अवैद्य दारूसह चिंचवड पोलिसांनी एकाला पकडले. चिखलीतील किराणा दुकानातून पाच हजार ८८० रुपयांच्या दारूसह एकाला ताब्यात घेतले. चिंबळी येथे राहत्या घरात पाच हजार २५० रुपयांची हातभट्टी दारू बाळगल्याप्रकरणी एका महिलेवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. तसेच मोशीतील लेबर कॅम्पमध्ये तीन हजार रुपयांची गावठी दारू बाळगणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत