पुणे: पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना पावसामुळे उद्या, गुरुवार (१४ जुलै) सुटी जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही महापालिकांकडून परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. 

पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याला गेल्या काही दिवसांत पावसाने झोडपून काढले आहे. तसेच हवामान विभागाने पुढील १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर  विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी होणारी गैरसोय, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सुटी देण्याचा निर्णय दोन्ही महापालिकांनी जाहीर केला. 

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी आणि माध्यमिक विभागाचे प्रशासकीय अधिकारी पोपट काळे यांनी संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १४ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने शाळेत उपस्थित राहतील असे नमूद करण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनीही १४ जुलैला महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या बालवाडी ते माध्यमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आल्याची माहिती परिपत्रकाद्वारे दिली. पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.