पुणे : मुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) दैनंदिन कामकाज काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
पक्क्या वाहन परवान्यांसाठी मंचर येथे घेण्यात येणारे शिबिर आता शुक्रवारी (१० जुलै) घेण्यात येणार आहे. तसेच सोमवारी (६ जुलै) योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आलेल्या वाहनांची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या दैनंदिन क्षमतेनुसार पुढील ७ ते १० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. सोमवारी आयडीटीआर येथील वाहनचालक चाचणी, शिकाऊ वाहन चालवण्याच्या परवाना चाचणीसाठी उपस्थित राहू न शकलेल्या अर्जदारांनी आपली अपॉइंटमेंट सोयीनुसार किंवा येत्या दहा दिवसांत बदलून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
चारचाकी वाहनांच्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी डिमांड ड्राफ्ट जमा करण्याची मुदत मंगळवारी (७ जुलै) दुपारी अडीच वाजेपर्यंत वाढविण्यात आली. तर एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित क्रमांकाचा लिलाव बुधवारी (८ जुलै) दुपारी साडेतीन वाजता करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून कळविण्यात आले.
पालखी सोहळ्यासाठी कामकाजात बदल
संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज पुढे ढकलण्यात येणार आहे. गुरूवारी (९ जुलै) आळंदी रस्ता कार्यालयातील वाहन तपासणी आणि वाहन चालन परवाना चाचणीचे नियमित कामकाज होणार नाही.
तसेच आयडीटीआरकडे जाणारे मार्ग बंद राहण्याची शक्यता असल्याने तेथील चाचण्यांवरही परिणाम होणार असून, गुरूवारी वाहन तपासणी किंवा वाहन चालन परवाना चाचणीसाठी अपॉइंटमेंट असलेल्या अर्जदारांना १० ते २० जुलै या कालावधीत कोणत्याही कार्यालयीन दिवशी उपस्थित राहून चाचणी देता येणार आहे. त्यासाठी ९ जुलैची अपॉइंटमेंट ग्राह्य धरण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली.
