पुणे : पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचे लोकार्पण आणि पुणे मेट्रो फेज-२ च्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी ते हिंजवडी फेज-२ असा मेट्रोतून प्रवास केला. या नव्या मार्गावरील पहिले तिकीट मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः घेऊन मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतला.
प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाळकरी विद्यार्थिनी, आयटीएन्स यांच्याशी संवाद साधला. मेट्रो प्रवासाचा अनुभव, उपलब्ध सुविधा आणि नव्या मार्गामुळे दैनंदिन प्रवासात होणारे फायदे याविषयी त्यांनी जाणून घेतले. मुख्यमंत्री व मान्यवरांनी हिंजवडी फेज-२ मेट्रो स्थानकापर्यंत सुमारे सहा किलोमीटरचा प्रवास केला.
या वेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांना मेट्रो मार्ग, स्थानके आणि प्रकल्पाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली.
या प्रवासात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
या पिंक मेट्रोचे संचालन महिला ट्रेन पायलटकडे होते. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले, तर ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली.
‘पुणे मेट्रो मार्गिका-३’ची (पुणेरी मेट्रो) ठळक वैशिष्ट्ये
- माण-हिंजवडी ते शिवाजीनगर अशी २३.२ किलोमीटर लांबीची मार्गिका
- सार्वजनिक-खासगी भागीदारी २३ स्थानकांची उभारणी
- प्रकल्पासाठी ८ हजार ३१३ कोटी रुपयांचा खर्च
- ९० महिला चालक आणि एकूण मनुष्यबळापैकी ५० टक्के कर्मचारी महिला असलेली पिंक मेट्रो
- हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला शिवाजीनगरशी थेट जोडणाऱ्या या मेट्रोमुळे हजारो आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित व सुविधाजनक प्रवासाचा लाभ
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन
खडकवासला-खराडी, वनाज-चांदणी चौक, रामवाडी-वाघोली आणि मानिकबाग-नळस्टॉप या सुमारे ४६ किलोमीटरच्या नव्या मार्गिकांच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. येत्या साडेचार वर्षांत हा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या विस्तारामुळे पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरपेक्षा अधिक होणार असून, पुण्याच्या चारही दिशांना मेट्रोची सेवा उपलब्ध होणार आहे.
