पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागासह इतर ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या फटाका स्टॉल्समुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने अतिक्रमण नियंत्रण विभागाला बेकायदा फटाका स्टॉलवर कारवाई करण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रानंतर अतिक्रमण विभागाने पाहणी सुरू केली आहे.

‘शहरातील अनधिकृत फटाका स्टाॅल्सवर कारवाई करा,’ असे पत्र महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने अतिक्रमण नियंत्रण विभागाला दिले आहे. ‘दिवाळीनिमित्त शहरात अनेक फटाका स्टाॅल्स दाट लोकवस्तीच्या भागांत, मुख्य बाजारपेठांमध्ये, इमारतींच्या जवळ, रस्त्यावर, पादचारी मार्गावर, सोसायटीच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.

या स्टाॅल्ससाठी आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना करणे, स्टाॅल्स धारकांनी आवश्यक ती परवानगी घेणे आवश्यक आहे. अग्निशमन दलाकडून नियमांनुसर परवानगी दिली नसल्यास आणि तेथे दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी,’ असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

महापालिकेने फटाका स्टॉल्ससाठी जागा निश्चित करून लिलाव करून स्टॉल्सचे वाटप केले. मात्र, या लिलावाकडे दुर्लक्ष करून अनेक ठिकाणी बेकायदा फटाका विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागांमधील पेठांसह उपनगरांमध्ये बिनदिक्कतपणे हे स्टॉल्स उभारण्यात आले असून, महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनिमित्त फटाका विक्री करण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वतीने मैदानांवर, मोकळ्या जागेत, नदीपात्रात फटाका स्टाॅल्ससाठी परवानगी देते. दाट लोकवस्तीत फटका स्टाॅल्सना परवानगी दिली जात नाही. यंदा महापालिकेने ११ ठिकाणे निश्चित केली असून, या ठिकाणी १८४ फटाका स्टाॅल्स लावण्याला परवानगी देण्यात आली आहे.

महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर फटाका स्टाॅल्स लावणे बंधनकारक आहे. यासाठी ४० अटी आणि शर्ती नमूद केल्या आहेत. त्यांची पूर्तता केल्यानंतरच फटाका स्टॉल्स उभारता येतात. महापालिकेने स्टॉल उभारणीसाठी दिलेल्या अटी-शर्तींमध्ये फटाका विक्रीच्या दोन गाळ्यांमध्ये सर्वसाधारणपणे तीन मीटर अंतर ठेवणे, स्टॉल मुख्य रस्त्यापासून अथवा अन्य आस्थापनांपासून किमान १० मीटर लांब अंतरावर आवश्यक अशा अटींचा समावेश आहे. मात्र, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठेसह दाट लोकवस्तीच्या भागात आणि उपनगरांमध्ये रस्त्यांवर, फूटपाथवर, गल्लीबोळातील रस्त्यांवरही अनेक फटाका स्टाॅल्स उभारण्यात आल्याचे चित्र आहे.

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर म्हणाले, शहरात फटाका स्टॉल उभारण्यासाठी महापालिकेचा मालमत्ता व्यवस्थापन विभाग जागा उपलब्ध करून देते. त्या व्यतिरिक्त शहरातील विविध भागांमध्ये बेकायदा पद्धतीने फटाका स्टॉल उभारण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींची शहानिशा करून फूटपाथवर तसेच परवानगी न घेता उभारलेल्या स्टॉल्सवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.