पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघातील कामाची चौकशी करण्याचा प्रस्ताव देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा निधी शून्य करण्याचा ठराव दोन दिवसांपूर्वी भाजपने बहुमताच्या जोरावर मान्य केला. त्यानंतर आता या ठरावावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणारे याच पक्षाचे नगरसेवक सुहास टिंगरे यांच्या प्रभागासाठी असलेले १२ कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याही प्रभागाला शून्य निधी झाला आहे.

स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत भाजपच्या दोन नगरसेवकांनी टिंगरे यांच्या प्रभागातील १२ कोटींचा निधी दुसऱ्या प्रभागात वर्ग करण्याचा प्रस्ताव दिला. स्थायी समितीत बहुमत असल्याने मतदान घेत हा प्रस्ताव मान्य करून पुढील मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला जाणार आहे.

नगरसेवक टिंगरे यांच्या प्रभाग क्रमांक २ -ड मधील कामांचा निधी आता प्रभाग क्रमांक ३ मधील कामांसाठी वळविण्यात आला आहे. भाजप नेत्याच्या मतदार संघातील कामाची चौकशी करण्याचा प्रस्ताव दिल्याने सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा वाचपा काढण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील भाजपकडून सुरू करण्यात आलेल्या या मनमानी कारभारावर विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक बालवडकर यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या कामांसाठी अधिक खर्च केल्याचा आरोप करत या कामांची तपासणी करण्याचा ठराव स्थायी समितीसमोर दिला होता. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील ही कामे होती. हा प्रस्ताव भाजपने कोणतीही चर्चा न करता दफ्तरी दाखल केला.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील कामांची चौकशी करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी दिल्याने नाराज झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही नगरसेवकांचा निधी कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी बालवडकर यांचा निधी शून्य करण्यात आला. तर, गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणारे नगरसेवक टिंगरे यांचा १२ कोटी निधी मतदान घेत शेजारच्या प्रभागात वळविण्यात आला.

‘सत्ताधारी भाजपच्या या निर्णयाच्या विरोधात संविधानाच्या मार्गाने लढा उभारणार आहे,’ असे टिंगरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘पक्षाच्या सहकाऱ्याच्या ठरावाला मी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. राजकीय वैमनस्यातून आणि सूड भावनेतून सत्ताधाऱ्यांनी हा डाव साधला.’