पुणे : पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांमध्ये ‘पत्रसंघर्ष’ सुरू झाला आहे. दोन्ही शहराध्यक्षांनी एकमेकांच्या पक्ष वरिष्ठांना आणि प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून या मतभेदांमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी मनमानी कारभार करित असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले होते. त्यानंतर आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून पुणे महापालिकेतील ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांच्या भूमिकेवर आक्षेप घेतले आहेत.
‘राज्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सत्तेत एकत्र आहेत. शिवसेनेसह (शिंदे) महायुती म्हणून दोन्ही पक्ष काम करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला ११९ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, असे असतानाही महायुतीचा धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नगरसेवकांना भाजपकडून सन्मानपूर्वक वागणूक, प्रभाग समितीत प्रतिनिधित्व आणि पुरेसा निधी देण्यात आला,’ असा दावा घाटे यांनी पत्रात केला आहे.
‘राज्यात भाजपबरोबर महायुतीत सहभागी असलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांनी तिरंगा यात्रेसह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर मंजूषा नागपुरे यांच्यावर अनेकदा टीका केली. तसेच, स्थायी समितीतील दोन सदस्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीच्या चौकशीची मागणी केली,’ असा तक्रारवजा उल्लेखही घाटे यांनी पत्रात केला आहे. तसेच, ‘या प्रकारांबाबत ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवकांना जाब विचारण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले,’ असा आरोप घाटे यांनी केला आहे.
घाटे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे, ‘भाजपकडून प्रत्येक वेळी सन्मानपूर्वक वागणूक दिली जात असताना, मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांनी काळ्या फिती बांधून भाजपचा निषेध केला. विविध विकासकामांच्या विषयांनाही विरोध केला. ही वागणूक महायुतीच्या धर्माला हरताळ फासणारी आहे.’
‘या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून ‘राष्ट्रवादी’च्या शहर नेतृत्वाला आणि नगरसेवकांना, महापालिका स्तरावर महायुतीच्या समन्वयाने काम करण्यासाठी आवश्यक सूचना द्याव्यात,’ अशी मागणी घाटे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.
सभागृह नेते बीडकर यांनीही दिले होते पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक मनमानी करत असल्याचा आरोप करत त्यांना समज द्यावी, असे पत्र महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठविले होते. राज्यात दोन्ही पक्ष एकत्र असतानाही पुणे महापालिकेत राष्ट्रवादी चे नगरसेवक कसे चुकीचे वागत असल्याचे या पत्रात म्हटले होते.
