पुणे : महापालिकेची जुनी हद्द, समाविष्ट ३४ गावे आणि ‘चल लोकसंख्ये’सह शहरातील सुमारे ८१ लाख ६४ हजार लोकसंख्या पाण्यासाठी महापालिकेवर अवलंबून असेल, असा अंदाज महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालामध्ये वर्तविण्यात आला आहे. शहरातील वायू, जल प्रदूषणाच्या समस्या कायम असून, वाहतूक कोंडीची समस्याही उग्र रूप घेत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने २०२५-२६ चा पर्यावरण स्थिती अहवाल सादर केला. यावर पुढील महिन्यात सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. या अहवालानुसार, पुणे महापालिकेत नव्याने ३४ गावे समाविष्ट झाल्यामुळे किती लोकसंख्या वाढेल, याचा अंदाज बांधण्यासाठी महापालिकने तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केली होती. त्यांनी २०११ची जनगणना आणि अन्य शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून, ३४ गावांमध्ये १९ लाख १० हजार ५०७ लोकसंख्या असेल, असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे महापालिकेची जुनी हद्द, ३४ समाविष्ट गावे आणि चल लोकसंख्या (फ्लोटिंग लोकसंख्या) अशी एकूण ८१ लाख ६४ हजार ८६८ लोकसंख्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेवर अवलंबून असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
या अहवालानुसार, शहरातील हवेमध्ये ‘पीएम २.५’ आणि नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. रस्त्यांवर वाढणारी वाहनांची संख्या, नदीत सोडले जाणारे दूषित पाणी, वाढणारी बांधकामे, वाढते औद्योगिकीकरण यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यावसायिक आस्थापनांना स्वच्छ इंधनाचा वापर बंधनकारक करणे, उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घालणे आणि मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर सेन्सरआधारित धूळ निरीक्षण यंत्रणा बसवण्यासारखे उपाय केले जात आहेत.
शहरात अतिसाराचे साडेनऊ हजार रुग्ण
शहरात विषमज्वर, विषाणूजन्य कावीळ, कॉलरा आणि जिवाणूजन्य आमांश या चारही रोगांच्या एकत्रित रुग्णसंख्येच्या जवळपास चारपट रुग्ण हे केवळ तीव्र अतिसाराचे असल्याचे महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरणाच्या सद्य:स्थिती अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरात २०२५ मध्ये अतिसाराचे ९ हजार ५९९ रुग्ण आढळले. अहवालामध्ये शहरातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. तीव्र अतिसार (एडीडी) ९ हजार ५९९, विषाणूजन्य कावीळ १३५, विषमज्वर ११०, आमांश १७९, कॉलरा १ अशा रुग्णांची नोंद झाली आहे. दूषित पाणी आणि अन्नामुळे हे रोग होत असल्याने नागरिकांनी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणी प्यावे, हात स्वच्छ धुवावेत आणि बाहेरील अन्न टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी केले.
