पुणे : शहराचा वाढता विस्तार पाहता महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवरील जबाबदारी अधिक वाढली असून, अग्निशमन सेवा शुल्क आणि वार्षिक शुल्काची आकारणी करण्यास विभागाने प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.

शहरातील ज्या सोसायट्या अग्निशमन विभागाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घेत नाहीत. तसेच, मुदत संपल्यानंतरही अग्निशमन प्रमाणपत्राचे नूतनीकरण करत नाहीत. त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून हे शुल्क वसूल करण्याची तयारी विभागाने सुरू केली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोचिंग क्लास, पीजी, शैक्षणिक इमारती, धोकादायक गोदामे, भंगारची दुकाने, रुग्णालये, पेट्रोल पंप आणि इतर आस्थापनांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमध्ये अनेक आस्थापना अग्निशमन उपाययोजना करीत नसल्याचे समोर आले आहे. तसेच, आस्थापना चालविण्यासाठी आवश्यक असलेली मान्यता आणि महापालिकेचे दरवर्षी नूतनीकरणासाठी भरावयाचे शुल्कदेखील भरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेकडून अंतिम भोगवटा पत्र देताना ठराविक रकमेचे अग्निशमन शुल्क घेतले जाते. या शुल्काच्या एक टक्के रक्कम संबंधित आस्थापनांनी आणि मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी महापालिकेकडे भरून त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे महापालिकेला दरवर्षी काही कोटी रुपयांची रक्कम शुल्क म्हणून मिळू शकते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला नवीन बांधकामांना परवानगी देऊन अंतिम भोगवटा पत्र दिल्यानंतर १५० ते २०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. दरवर्षी त्यावर एक टक्का रक्कम म्हणजे १५ ते २० कोटी रुपये संबंधित आस्थापनांनी महापालिकेकडे भरणे बंधनकारक आहे.

अग्निशमन सुरक्षा कायद्यामध्येच त्या बाबतची तरतूद आहे. मात्र, अंतिम भोगवटा पत्र मिळाल्यानंतर बहुतांश आस्थापना एक टक्का रक्कम महापालिकेकडे भरत नसल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले.

‘शहरातील आस्थापनांनी दरवर्षी एक टक्के एवढी रक्कम शुल्क म्हणून भरणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेचा महसूल बुडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याचा आढावा घेऊन ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय अग्निशमन विभागाने घेतला असून, त्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आयुक्तांकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे,’ असे सोनुने यांनी सांगितले. यामुळे महापालिकेला दरवर्षी १५ ते २० कोटींचा महसूल मिळणार आहे.

गणेश सोनुने म्हणाले, शहरातील आस्थापनांनी दरवर्षी अग्नीशमन विभागाचे एक टक्का शुल्क महापालिकेकडे भरणे आवश्यक आहे. तसेच, महापालिकेने दिलेल्या अग्निशमन प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.