पुणे : गणेशखिंड रस्त्याचे रुंदीकरण करताना अडथळा ठरत असल्याने दुसरीकडे हलविलेली बहुतांश झाडे सुस्थितीत असल्याचा अहवाल उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्याने दिला आहे. स्थलांतरित अथवा नव्याने लागवड केलेली सुमारे ९६ टक्के झाडे जगली आहेत, असे प्रशासनाच्या अहवालामध्ये म्हंटले आहे.

या रस्त्याच्या कामासाठी स्थलांतरित करण्यात आलेली आणि वाकडेवाडी येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या आवारात लावण्यात आलेल्या ३५६ झाडे या आवारात पाईपलाईनचे काम करताना तुटली आहेत. त्यामुळे नव्याने झाडे लावण्याबाबत महापालिकेने संबधित संस्थेला कळविले आहे.

गणेशखिंड रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम महापालिकेने तीन वर्षांपूर्वी सुरू केले होते. संचेती रुग्णालय ते आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) या दरम्यान असलेल्या रस्त्याचे ४५ मीटर रुंदीकरण करण्यात आले. हे काम करताना रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारी जुनी झाडे तोडून ती दुसरीकडे लावण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. ही झाडे तोडण्यास शहरातील वृक्षप्रेमींनी विरोध केला. महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. रस्ता रुंदीकरण करणे किती आवश्यक आहे, हे महापालिकेने न्यायालयात पटवून दिले होते.

दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने रस्त्याचे रुंदीकरण करण्यास मान्यता देताना बाधित होणाऱ्या झाडांचे स्थलांतर आणि नव्याने झाडे लावण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. स्थलांतरित तसेच नव्याने लावलेल्या झाडांचे जिओ टॅगिंग करून प्रत्येक तीन महिन्यांनी या झाडांच्या सद्य:स्थितीची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक केले.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाच्या वेळी काढलेल्या झाडांचे स्थलांतर तसेच नव्याने झाडे लावताना पंचवटी परिसरात ८५८, गणेशखिंड रस्ता परिसरात १७५, औंध येथील पशु संवर्धन आयुक्तालयाच्या जागेत १ हजार ८८९, या भागात नदीच्या कडेला ४४७, खडकी येथील अंडी उबवणी केंद्राच्या आवारात १ हजार २९० आणि वाकडेवाडी येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या आवारात ३५६ अशी ५ हजार १५ झाडे लावली होती. या झाडांची स्थिती तपासण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्याने जिओ टॅगिंगद्वारे तयार केलेला या झाडांचा सद्य:स्थितीचा अहवाल नुकताच सादर केला आहे.

या अहवालामध्ये बहुतांश झाडे जगली असल्याचे स्पष्ट केले आहे. तर, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या आवारात लावण्यात आलेली ३५६ झाडे पाईपलाईनची कामे करताना तुटली असल्याचे नमूद केले आहे. प्रशिक्षण केंद्र प्रशासनाने त्यांच्या आवारातील जागांवर ३५६ नव्याने झाडे लावावीत, असे पत्र महापालिकेने संबधित संस्थेला दिले आहे.

उर्वरीत पाच ठिकाणी लावलेल्या पंचवटी परिसरात लावलेल्या झाडांपैकी ४०, गणेशखिंड रस्त्यावरील २, औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या आवारातील ८०, पशु संवर्धन केंद्राच्या लगतच्या नदीच्या बाजूने लावण्यात आलेली २५ आणि अंडी उबवणी केंद्रातील ३५ झाडे अशी १८२ झाडे एकतर जळून गेली आहेत अथवा तुटल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.