पुणे : गणेशोत्सवासाठी वैद्यकीय कक्ष आणि हिरकणी कक्ष उभारण्यासाठी एक कोटी ५ लाख रुपयांच्या निविदा झोन क्रमांक ५ च्या वतीने काढण्यात आल्या आहेत. २५ सप्टेंबरला गणेश विसर्जन असताना २१ सप्टेंबरला या निविदा उघडणार असून, २० दिवसांसाठी हे कक्ष सुरू असतील, असे महापालिकेने काढलेल्या जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ही महापालिकेच्या निधीची उधळपट्टी असून, या निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.
गणेशोत्सवाच्या दरम्यान वैद्यकीय कक्ष आणि हिरकणी कक्ष उभारण्यासाठी महापालिकेच्या झोन क्रमांक ५ च्या वतीने १२ सप्टेंबर रोजी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. प्रत्येकी २१ लाख १८ हजार ५०० रुपये दराच्या स्वतंत्र पाच निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदा २१ सप्टेंबर रोजी उघडणार आहे.
त्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे २५ सप्टेंबरला गणेश विसर्जन होणार आहे. मात्र, महापालिकेने काढलेल्या निविदेच्या जाहिरातीमध्ये कामाचा कालावधी २० दिवसांचा नमूद करण्यात आला आहे. या निविदांवर सजग नागरिक मंचाने आक्षेप घेतला असून, यामुळे महापालिकेच्या निधीची उधळपट्टी होणार असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला.
‘या निविदा रद्द करून महापालिकेच्या निधीची उधळपट्टी थांबवावी,’ अशी मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. पुण्याची मुख्य विसर्जन मिरवणूक ही लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता या मार्गावर असते. या मार्गावर विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकीजजवळ महापालिकेचा कलावती मावळे दवाखाना, स. गो. बर्वे शाळा, लक्ष्मी रस्त्यावरच हुजूरपागा शाळा, लगतच नू.म.वि. शाळा, गोखले सभागृह, कुमठेकर रस्त्यावर ट्रेनिंग कॉलेज, टिळक रस्त्यावर हिराबाग चौकातील महापालिका क्षेत्रिय कार्यालय, टिळक रस्त्यावर स. प. महाविद्यालय तसेच न्यू इंग्लिश स्कूलच्या वर्गखोल्या वैद्यकीय कक्ष आणि हिरकणी कक्षासाठी अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकतात.
‘महापालिकेने या शैक्षणिक संस्थांना विनंती केल्यास नाममात्र दरात अथवा मोफत स्वरूपातदेखील महापालिकेला वर्ग खोल्या उपलब्ध होऊ शकतात. मग त्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची उधळपट्टी करण्याची आवश्यकता काय आहे,’ असा प्रश्न वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.
या बाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘उपायुक्त पातळीवर ही निविदा काढली आहे. याची माहिती घेउन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
नगरसेवकांकडून निधी
महापालिकेने काढलेल्या निविदांबाबत विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील भवन विभागाचे कनिष्ठ अभियंता कमलेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘वैद्यकीय कक्ष आणि हिरकणी कक्षासाठी नगरसेवकांनी त्यांच्या निधीतून वर्गीकरद्वारे रक्कम उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार या निविदा काढल्या आहेत. वैद्यकीय कक्ष आणि हिरकणी कक्षासाठी महापालिकेने जागा निश्चित केल्या आहेत.’
