पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात आठ मार्चपासून ‘ह्युमन पॅपिलोना व्हायरस’ अर्थात ‘एचपीव्ही’ प्रतिबंधक लस देण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेला मुदतवाढ दिली असली, तरी आतापर्यंत केवळ १५५२ मुलींनीच या लशीचा लाभ घेतला आहे. दररोज केवळ दहा ते बारा मुलींना लसीकरण केले जात होते. एकीकडे लसीकरणाविषयी उदासीनता असून, दुसरीकडे मात्र, महापालिकेच्या कोट्यात वीस हजार लशींचा साठा पडून आहे.

मुलींमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका उद्भवू नये, यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने लसीकरणाची मोहीम आठ मार्चपासून हाती घेतली. मात्र, मे महिना संपला, तरी लसीकरणाचे उद्दिष्ट महापालिका गाठू शकली नाही. यासाठी आता ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत उर्वरित मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे. १४ वर्षांखालील मुलींना हे लसीकरण करण्यात येत आहे.
ही लसीकरण मोहीम सुरू होण्याआधीच स्वयंसेवी संस्थानी महापालिकेच्या सहकार्याने २ हजार २६५ मुलींना ही लस दिली. लसीकरण मोहीम सुरू होताच पहिल्या महिन्यात केवळ ३०३ जणींनी लस घेतली.

या लसीविषयी पालकांमध्ये मोठे गैरसमज असल्याने याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महापालिका प्रशासनाने या बाबत जागरुकता मोहीम हाती घेऊन शाळांनाही भेटी दिल्या होत्या. मात्र, याला फारसा प्रतिसाद म मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
८ मार्चपासून ते ३१ मे या कालावधीत शहरातील ३३ हजार मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात मात्र, महापालिकेकडून केवळ १५५२ मुलींचेच लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. पुण्यात महापालिकेची २० प्रसूतिगृहे, ५४ दवाखाने असून या ठिकाणी मोफत लसीकरण सुविधा उपलब्ध आहे.

कर्करोग उच्चाटनाचे उद्दिष्ट

महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाच्या ९९.७ टक्के रुग्णांमध्ये ‘एचपीव्ही’ या विषाणूचा संसर्ग असल्याचे आढळून आले आहे. २०३० पर्यंत गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या कालावधीपर्यंत ९० टक्के मुलींमध्ये लसीकरण करण्याचा उद्देश आहे.



या लशींसाठी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र, परीक्षांचा काळ, शाळांना असलेली सुटी यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला. या मोहिमेला मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ज्या मुलींचे लसीकरण राहिले आहे, त्यांनी ते करून घ्यावे. खासगी रुग्णालयात या लसीकरणाचा खर्च चार हजार रुपये येतो. महापालिका ही लस मोफत देत असून, याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. –डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका