पुणे : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले. महापालिकेने केलेल्या डिजिटल नोंदींच्या तपासणीत तीन उमेदवार संशयित आढळले असून, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली.या उमेदवारांना मदत करणाऱ्या संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरील दोन कर्मचारी आणि तीन उमेदवार अशा पाच जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी जानेवारी २०२४ मध्ये ११३ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानंतर पदसंख्या १६९ पर्यंत वाढविण्यात आली. ऑक्टोबर २०२५ मध्ये या पदांसाठी सुधारित जाहिरात काढून ऑनलाइन परीक्षा घेण्याची जबाबदारी ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन’ (आयबीपीएस) यांच्याकडे देण्यात आली.
संबंधित संस्थेने परीक्षा घेऊन निकाल जाहीर केल्यानंतर महापालिकेने पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीची यादी जाहीर केली. त्यानंतर या परीक्षेतील एका प्रश्नाचे छायाचित्र ‘एक्स’ या समाजमाध्यमावर प्रसारित झाले. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली जात होती.
समाजमाध्यमावर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रातील प्रश्नासह पर्यायांचा क्रम एका उमेदवाराच्या परीक्षेतील नोंदीशी जुळल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर या परीक्षेत पात्र ठरलेल्या ५४५ उमेदवारांच्या डिजिटल डेटा लॉगचे विश्लेषण करण्यात आले.‘या तपासणीमध्ये तीन उमेदवारांनी परीक्षा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये गैरप्रकार केल्याचे तांत्रिक पुरावे आहेत. यासाठी त्यांना केंद्रांवर नियुक्त दोन कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचेदेखील आढळले. या तीन उमेदवारांसह दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने पोलिसांत तक्रार दिली आहे,’ असे नायर यांनी सांगितले.
‘संंबंधित उमेदवारांनी कशा पद्धतीने परीक्षेत गैरप्रकार केला, याचा तपास पोलीस करतील. त्यानंतरच याचा उलगडा होईल. परीक्षा केंद्रातील स्वच्छतागृहात जॅमरचा प्रभाव नसतो. त्या ठिकाणी मोबाइल किंवा अन्य माध्यमातून गैरप्रकार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ‘अर्न्स्ट अँड यंग’कडूनही डिजिटल नोंदींचे स्वतंत्र विश्लेषण करण्यात आले आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
नायर म्हणाले, ‘या भरती प्रक्रियेतील १६९ पैकी १४६ पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १८ पदांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध झाले नसून, पाच उमेदवारांचे आदेश विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत.’
कनिष्ठ अभियंता परीक्षेत पेपरफुटीचा थेट पुरावा आढळलेला नाही. उपलब्ध डिजिटल नोंदींवरून परीक्षा सुरू असतानाच गैरप्रकार झाल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली. या गैरप्रकारात संशय असलेल्या तीन उमेदवारांसह दोन कर्मचारी अशा पाच जणांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून पोलीस तपासात याची अधिक माहिती समोर येईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर स्पष्ट केले
