पुणे : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदासाठी एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या भरती परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयतेला बाधा पोहोचविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात पोलिसांनी परीक्षार्थ्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. महापालिकेतील अधिकारी किशोरी तोडमल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंतापदाची ऑनलाइन परीक्षा २२, २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी घेण्यात आली. या परीक्षेत काही उमेदवारांनी परीक्षा केंद्रातील काही जणांशी संगनमत करून परीक्षा प्रक्रियेत अनुचित मार्गांचा अवलंब केल्याची तक्रार देण्यात आली होती.
परीक्षा सुरू झाल्यानंतर काही उमेदवार वारंवार प्रसाधनगृहात गेले, तसेच काहींच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात त्यांनी प्रश्न न सोडवता संगणकावर फक्त ‘स्क्रोलिंग’ केल्याचे तपासात आढळून आले. या परीक्षेतील एक प्रश्न समाज माध्यमात प्रसारित करण्यात आला होता. महापालिकेकडून एका कंपनीला या परीक्षेच्या संयोजनाची जबाबदारी देण्यात आली होती. संबंधित कंपनीला या प्रकरणाची चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशीत तीन उमेदवारांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. सीसीटीव्ही चित्रीकरणही तपासण्यात आले होते.
‘संबंधित कंपनीने अहवाल सादर केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रश्न समाज माध्यमात कसा प्रसारित झाला, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे,’ असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक नारायण पालमपल्ले तपास करत आहेत.
