पुणे : महापालिकेच्या विकास आराखड्यात जुन्या हद्दीत ३६ मीटर रुंदीचा असलेला रस्ता आता फक्त १५ मीटरचा प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची भीती असून, या रस्त्याची रुंदी ३६ मीटरच असावी आणि रस्त्याची अंतिम रुंदी निश्चित होईपर्यंत विकास प्रकल्पांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे.
कोथरूड भागातील शांतिवन चौक–एकलव्य कॉलेज ते राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याबाबत ही मागणी करण्यात आली. हा रस्ता केवळ १५ मीटरचा दाखविण्यात आला आहे. यामुळे या भागात वाहतूक कोंडीची भीती व्यक्त करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिलीप वेडे पाटील, रोहिणी चिमटे यांनी ही मागणी केली.
आपल्या मागणीचा प्रस्ताव या दोघांनी स्थायी समितीकडे मान्यतेसाठी दिला आहे. ‘जुन्या विकास आराखड्यात हा रस्ता ३६ मीटर दाखविण्यात आलेला असताना समाविष्ट गावे महापालिकेत आल्यानंतर हा रस्ता १५ मीटर रुंदीचा प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे भविष्यकाळात या परिसरात अरुंद रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार असून, महापालिकेच्या चुकीमुळे वाहनचालकांना कोंडीत अडकून पडावे लागणार आहे,’ अशी भीती नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी व्यक्त केली.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे कोथरूड येथील रहिवाशी असून त्यांच्यासह राज्याची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. गेल्या काही वर्षांमध्ये कोथरूड आणि परिसराचा होत असलेला विस्तार लक्षात घेता या भागातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील रस्ते अधिक रुंद व्हावेत, यासाठी बैठका घेत असतात. कोथरूड परिसरातील भूसंपादन अभावी अनेक मिसिंग लिंकची कामे रखडली आहेत. ही कामे पूर्ण व्हावीत यासाठी देखील महापालिकेत वारंवार बैठका होत आहेत.
पुणे महापालिकेच्या १९८७ च्या विकास आराखड्यात (डीपी) भारतरत्न महर्षी कर्वे स्मारक ते शांतिवन चौक हा रस्ता ३६ मीटर रुंदीचा दर्शविण्यात आला आहे. त्यानुसार जुन्या कोथरूड हद्दीतील रस्ता विकसित करण्यात आला. मात्र, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यात याच रस्त्याचा पुढील भाग शांतिवन चौक–एकलव्य कॉलेज ते राष्ट्रीय महामार्ग हा ३६ मीटर रुंद ऐवजी केवळ १५ मीटर रुंदीचा प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे या रस्त्याच्या दोन भागांच्या रुंदीत चक्क २१ मीटरची तफावत निर्माण झाली आहे.
