पुणे : महानगरपालिकेचे ‘मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालय’ पुन्हा घोले रस्त्यावरील जुन्या जागी येण्याचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे मुद्रणालय अडचणीत आले आहे. केंद्र सरकारकडून चार कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याने मुद्रणालयाची ऐतिहासिक इमारत जमीनदोस्त करून या ठिकाणी २७ कोटी रुपयांचा ‘सिटी ग्रंथालया’चा प्रकल्प उभारला जात आहे.
सिटी ग्रंथालयाची इमारत उभारताना तेथे मुद्रणालयासाठी जागा देण्याचे निश्चित करून मुद्रणालयाचे स्थलांतर वडगाव बुद्रुक येथे तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आले होते. मात्र, सिटी ग्रंथालयाच्या प्रकल्पांमध्ये मुद्रणालयाची जागाच न ठेवल्याने हे ऐतिहासिक मुद्रणालय पुन्हा मूळ जागेत येण्याचा मार्ग बंद झाला आहे.त्यातच महापौर मंजूषा नागपुरे यांनी वडगाव बुद्रुक येथे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आलेल्या मुद्रणालयाला टाळे लावल्याने मुद्रणालयासाठी आता शहराच्या उपनगरांमध्ये नवीन जागेचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे.
सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी भाषेतील मजकुराच्या आधुनिक पद्धतीच्या मुद्रणासाठी मामाराव दाते यांनी यांत्रिक प्रणाली विकसित केली. महापालिकेने त्यांचे नाव मुद्रणालयाला दिले. घोले रस्त्यावर महापालिकेचे हे ऐतिहासिक मुद्रणालय होते. भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेविकेने ‘सिटी ग्रंथालय’ उभारण्याचा प्रस्ताव दिला.
या प्रकल्पासाठी तत्कालीन खासदार प्रकाश जावडेकर यांच्याकडून चार कोटी रुपयांचा निधीही मिळाला. मात्र, या पूर्ण प्रकल्पासाठी महापालिकेला २७ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी दाते मुद्रणालयाची इमारत पाडून तेथे ‘सिटी ग्रंथालया’चा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या भागात ‘सिटी ग्रंथालय’ उभारण्याची मागणी नसतानाही हा प्रकल्प केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
मुद्रणालयाची इमारत जुनी झाल्याने ती पाडून तेथे ‘सिटी ग्रंथालय’ उभारायचे आणि याच भागात मामाराव दाते मुद्रणालयदेखील करायचे, अशी चर्चा सुरुवातीच्या काळात होती. मात्र, ठराव करताना महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांनी या भागात किंवा मुद्रणालयासाठी पर्यायी ठिकाणी व्यवस्था केली जाईल, असा ठराव मान्य केला. मात्र त्यानंतर सिटी ग्रंथालयाच्या बांधकाम आराखड्यात मुद्रणालयासाठी जागाच निश्चित केली नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे मामाराव दाते मुद्रणालय पुन्हा जुन्या जागी येणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तीन दिवसांपूर्वी वडगाव बुद्रुक भागातील ज्या शाळेच्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात मुद्रणालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याला महापौर नागपुरे यांच्या आदेशाने टाळे ठोकण्यात आले. हे मुद्रणालय इतर ठिकाणी हलविण्याचे आदेश महापौर नागपुरे यांनी प्रशासनाला दिले असल्याने मुद्रणालयासाठी नवीन जागेचा शोध घेण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत सिटी ग्रंथालयाच्या बांधकामावर १२ कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या सात वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून त्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे.
भवन विभागाचे प्रमुख बिपीन शिंदे म्हणाले, घोले रस्त्यावरील मामाराव दाते मुद्रणालयाच्या जागेत ‘सिटी ग्रंथालया’चा प्रकल्प केला जात आहे. मुद्रणालय पुन्हा येथे आणण्याचे ठरले होते. मात्र, प्रकल्पाचा आराखडा तयार करताना मुद्रणालयाचा कोणताही उल्लेख नाही. महापौर नागपुरे यांनी वडगाव बुद्रुक येथील मुद्रणालय स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. घोले रस्त्यावरील जागेत मुद्रणालय आणणे अशक्य आहे. त्यामुळे आम्ही नवीन जागेचा शोध घेत आहोत.
