पुणे : करोनाच्या काळानंतर वडगाव बुद्रुक भागात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आलेले महापालिकेचे ‘मुद्रणमहर्षी मामाराव दाते’ मुद्रणालय येत्या दोन महिन्यांत पुन्हा घोले रस्त्यावरील मूळ जागेत येणार आहे. महापालिका प्रशासनाने महापौर मंजूषा नागपुरे यांना तसे पत्र दिले आहे. मात्र, घोले रस्त्यावरील जागेत प्रस्तावित असलेल्या ‘सिटी लायब्ररी’च्या इमारतीमध्ये मुद्रणालयासाठी जागा ठेवण्यात आली नसल्याचे समोर आल्याने मुद्रणालय या ठिकाणी कसे आणणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घोले रस्त्यावरील जागेत महापालिकेचे दाते मुद्रणालय होते. या जागेत ‘सिटी लायब्ररी’चा प्रकल्प उभारण्यासाठी हे मुद्रणालय वडगाव बुद्रुक येथील शरदचंद्र पवार ई लर्निंग स्कूलच्या तळघरात हलविण्यात आले. या मुद्रणालयामध्ये महापालिकेच्या विविध विभागांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची छपाई होते. महापालिकेचे मुद्रणालय शाळेच्या इमारतीमध्ये असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, हे मुद्रणालय तेथून हलविण्यात यावे, असे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले होते.
याचे पत्र त्यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र या पत्राला कोणतेही उत्तर प्रशासनाने दिले नाही. त्यामुळे महापौर नागपुरे यांनी दाते मुद्रणालयाची जाऊन पाहणी केली आणि तातडीने हे मुद्रणालय बंद करण्याचे आदेश दिले. तेथे टाळे ठोकण्यात आले. या बाबतची दृश्यफितदेखील समाजमाध्यमांवर प्रसारित झाली.
टाळे ठोकण्यात आल्यामुळे मुद्रणालयाचे काम बंद पडले. महापौरांनी आदेश दिल्यानंतर मुद्रणालयाला टाळे ठोकण्यात आले. बुधवारी सकाळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी महापौरांना सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याचे कारण सांगितले. त्यानंतर टाळे खोलण्यात आले. दरम्यान, हे मुद्रणालय मूळ जागेत पुन्हा दोन महिन्यांमध्ये आणले जाईल, असे जगताप यांनी सांगितले. घोले रस्त्यावरील मुद्रणालयाच्या जागेत सुरू असलेल्या ‘सिटी लायब्ररी’च्या आराखड्यामध्ये मुद्रणालयासाठी जागाच ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे हे मुद्रणालय येथे पुन्हा कसे आणणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
महापौर नागपुरे म्हणाल्या, वडगाव बुद्रुक येथील शाळेच्या इमारतीत मुद्रणालय असल्याने ते हलवावे, अशी पत्रे यापूर्वी अनेकदा प्रशासनाला दिली होती. त्यावर काहीही निर्णय घेतला जात नव्हता. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सूचना दिल्यानंतर प्रशासनाने कुलूप लावले. विरोधी पक्षनेते निलेश निकम म्हणाले, घोले रस्त्यावरील दाते मुद्रणालयाच्या जागेवर ‘सिटी लायब्ररी’च्या प्रकल्पासाठी हे मुद्रणालय तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आले होते. घोले रस्त्यावरील जागेतच त्याचे पुन्हा स्थलांतर होणे आवश्यक आहे. या ठिकाणी मुद्रणालय पुन्हा सुरू न झाल्यास ‘सिटी लायब्ररी’देखील सुरू होऊ देणार नाही.
महापालिकेचे उपायुक्त माधव म्हणाले, महापालिकेचे मामाराव दाते मुद्रणालय पुन्हा मूळ जागेत आणले जाणार आहे. दोन महिन्यांत हे स्थलांतर होईल, असे पत्र महापौर नागपुरे यांना प्रशासनाने दिले आहे. बुधवारी मुद्रणालय सुरू होते. सध्या मूळ जागेत बांधकाम सुरू असल्याने वडगाव बुद्रुक भागात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.
