पुणे : पुणे महापालिकेने घोले रस्त्यावर बांधलेल्या महापौर निवासस्थानाचे नाव ‘रामदूत’ करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा विरोध केला आहे. या वास्तूचे नाव बदलल्यास पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजपच्या) नगरसेवकांनी महापौर बंगल्याचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नाव समितीकडे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मागणीला महापौर मंजूषा नागपुरे यांनी देखील समर्थन दर्शविले आहे.
महापौर निवासस्थानाचे नाव बदलण्याचे नवीन पायंडे पाडले जाऊ नयेत. ‘महापौर निवास’ हेच नाव कायम ठेवावे,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केली. दरम्यान, ‘मुळा-मुठा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी मंजूर करण्यात आलेली निविदा नक्की कोणासाठी काढण्यात आली,’ अशी विचारणा करून चुकीच्या पद्धतीने मर्जीतील ठेकेदारांना काम देणे थांबवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आली.
रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास याकडे लक्ष वेधून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. महापालिकेतील पक्षाचे गटनेते काकासाहेब चव्हाण, नगरसेवक गफूर पठाण, नगरसेविका अनिता इंगळे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा स्वाती पोकळे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
शहराध्यक्ष श्रीकांत पाटील म्हणाले, ‘जलपर्णी नैसर्गिकरित्या वाहून गेल्यानंतरही जलपर्णी काढण्यासाठी निविदा काढून मान्य केल्या जातात. ही पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी आहे. मंजूर करण्यात आलेली निविदा तातडीने रद्द करावी. या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी. तसेच, शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्यांची अवस्थाही दयनीय झालेली आहे.
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील अनेक भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. वारंवार याबाबत आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत.’ असा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
भाजप पदाधिकाऱ्यांना खड्डे दिसतच नाही.
महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर पडलेले खड्डे दिसत नाही का ? की जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी विचारना देखील श्रीकांत पाटील यांनी केली आहे. पुणेकर रस्ते देण्यामध्ये महापालिकेतील भाजप पदाधिकारी अपयशी ठरले असल्याची टीका पाटील यांनी केली
