पुणे : रस्ते स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आलेल्या ठेकेदारांकडून योग्य पद्धतीने झाडकाम होत नसल्याचे समोर आल्याने. त्यामुळे या कामाची जबाबदारी असलेल्या चार ठेकेदारांना महापालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस देऊन खुलासा मागविला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी या नोटीस बजाविल्या आहेत.महापालिकेच्या वतीने रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शहरातील विविध भागातील रस्ते झाडून स्वच्छ करण्याची जबाबदारी संबधित ठेकेदारांवर देण्यात आली आहे.

ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट, प्रियंका एंटरप्रायझेस, सिद्धिविनायक एंटरप्रायझेस आणि सुमित फॅसिलिटीज या चार ठेकेदारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या ठेकेदारांकडून योग्य पद्धतीने रस्ते झाडण्याचे काम होत नसल्याचे या नोटिशीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने शहरातील झाडकामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रायोगिक तत्त्वावर ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडकाम प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, या प्रकल्पांतर्गत जबाबदारी सोपविलेल्या काही संस्थांकडून अपेक्षित काम होत नसल्याचे अतिरिक्त आयुक्त नायर यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले.

अतिरिक्त महापालिका आयुक्त नायर आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी सातारा रस्त्याची संयुक्त पाहणी केली. या पाहणीत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा, सुका कचरा आणि प्लास्टिक आढळले. पदपथ, दुभाजक तसेच रस्त्याच्या कडेला धूळ, माती आणि गाळ साचल्याचेही निदर्शनास आले. .रस्त्याची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत स्वच्छता होत नसल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे स्थानिक वायू आणि धूळ प्रदूषणामध्ये भर पडत असल्याचे महापालिकेने ठेकेदाराला बजाविलेल्या नोटिशीत म्हटले आहे.

ठेकेदारांना देण्यात आलेल्या नोटिशीचा समाधानकारक खुलासा न दिल्यास आर्थिक व प्रशासकीय दंड, सुरक्षा अनामत रक्कम जप्त करणे, कंत्राट रद्द करणे आणि संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. सातारा रस्ता, येरवडा-वडगावशेरी, ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कामांचा यामध्ये समावेश आहे. तसेच, शिवाजीनगर-घोले रस्ता, धनकवडी-कात्रज, औंध-बाणेर आणि हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय, तसेच सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत केल्या जाणाऱ्या झाडकामांचा यामध्ये समावेश आहे.

अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर म्हणाले, शहरातील रस्ते स्वच्छ रहावेत, यासाठी महापालिकेने रस्ते आणि परिसराचे झाडकाम ठेकेदारांना दिले आहे. या ठेकेदारांनी त्यांना दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे. महापालिकेने केलेल्या पाहणीत अनेक भागात झाडकाम होत नसल्याचे समोर आले. त्यामुळे संबधित ठेकेदारांना नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे.