पुणे : शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, जागोजागी पडलेले खड्डे, तुटलेले पदपथ आणि विविध रस्तेविषयक समस्यांवरून नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना खड्डे मुक्त रस्ते वापरता यावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी महापालिकेतील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांच्यासह पथ विभागातील कनिष्ठ अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंते रस्त्यावर उतरणार आहेत. रस्त्याची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी चारचाकीऐवजी दुचाकीवरच फिरावे, असे आदेश पथ विभागाने काढले आहेत.
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच प्रशासन ऐकत नसल्याने पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. त्यामुळे पथ विभागाने आता अभियंते आणि कर्मचाऱ्यांना थेट रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.
कनिष्ठ अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंत, तसेच परिमंडळ क्रमांक १ ते ५ मधील पथ विभागाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना दररोज सकाळच्या सत्रात प्रत्यक्ष स्थळपाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे करताना चारचाकीऐवजी दुचाकीचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. चार चाकी वाहनातून फिरताना रस्त्यांवर असलेली परिस्थिती लक्षात येत नाही. वाहनचालकांना, पादचाऱ्यांना काय त्रास होतो, हे समजत नाही. दुचाकीवरून अधिकारी फिरल्यास त्यांना वस्तुस्थिती त्वरित लक्षात येईल या हेतूने हे आदेश काढण्यात आल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या पथ विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार सकाळी ९.४५ ते ११.४५ या वेळेत संबंधित अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची पाहणी करणार आहेत. पाहणीवेळी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर प्रत्यक्ष स्थळावर जाऊन परिस्थितीची नोंद करावी आणि त्याचा दैनंदिन अहवाल विभागप्रमुखांकडे सादर करावा, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कामात कसूर केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
खड्डे, पदपथ अन् अतिक्रमणांवर नजर
नवीन रस्तेबांधणी, रस्ते देखभाल-दुरुस्ती, पूर्ण डांबरीकरण यांसह विविध कामे करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते, पदपथ, चौक, जल व मलवाहिन्यांची झाकणे, रस्त्यांवरील आणि पदपथांवरील खड्डे, रस्त्यांची झीज, अतिक्रमणे, तसेच अन्य पथविषयक समस्या शोधून काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाहणीदरम्यान आढळणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच रस्त्यांची सुरक्षितता आणि वाहनचालकांना मिळणारी सुविधा याचाही आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.
