पुणे : रस्ते खोदून पुन्हा ते शास्त्रीय पद्धतीने दुरुस्त न करणाऱ्या ठेकेदारांना वठणीवर आणण्यासाठी रस्ते खोदून डांबरीकरणाची कामे केलेल्या ठेकेदारांना त्यांच्या कामाचे पैसे पावसाळ्यानंतर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सोमवारी याबाबतचा आदेश विभागप्रमुखांना दिला.
महापालिकेच्या विविध विभागांना सेवावाहिन्या टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली आहे. ३१ मे पर्यंत रस्त्यांची खोदाईची कामे पूर्ण करून तेथे डांबरीकरण पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली. मात्र, अद्यापही अनेक विभागांची कामे प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर या कामांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी महापालिकेतील पथ, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि विद्युत या चार विभागांची बैठक घेतली. या वेळी पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, मलनिस्सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानाेरे, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशाेर जगताप यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित हाेते.
या बैठकीत पथ विभागाचे प्रमुख पावसकर म्हणाले, ‘विविध कामांसाठी खोदलेले रस्ते दुरुस्त करून त्याचे डांबरीकरण ठेकेदार योग्य पद्धतीने करत नाहीत. कामाचा दर्जा योग्य ठेवला जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडून त्यांची दुरवस्था होते. त्यामुळे महापालिकेच्या पथ विभागाला रस्ते दुरुस्तीसाठी आणि डांबरीकरणासाठी नंतर खर्च करावा लागतो. ठेकेदार काम झाल्यानंतर महापालिकेकडून कामाचे पैसे घेऊन निघून जातात. परिणामी खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी पथ विभागाला करावी लागते.’
यावर रस्त्यांची डागडुजी करून डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदारांना कामाचे पैसे पावसाळ्यानंतर देण्यात यावेत आणि पावसाळ्याच्या चार महिन्यांत रस्त्यांची दुरवस्था झाल्यास संबधितांकडून त्याची दुरुस्ती करता येईल. पावसाळा संपल्यानंतर संबधित रस्त्याची स्थिती पाहून त्यानंतरच ठेकेदाराच्या कामाचे पैसे द्यावेत, असा आदेश अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी बैठकीत दिला, असे पावसकर यांनी सांगितले. दरम्यान, रस्ते खोदाईसाठी खासगी कंपन्यांना दिलेली मुदत संपली असून, आता शहरातील कोणताही रस्ता खासगी कंपनीला खोदता येणार नसल्याचे पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘सात जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण करा’
शहरातील काही भागात पाणीपुरवठा, मलनिस्सारण तसेच विद्युत विभागाची महत्त्वाची कामे करण्यासाठी रस्ते खोदाईची कामे रखडली आहेत. पोलिसांच्या वाहतूक विभागाने ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याने कामाला विलंब झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर ‘रस्ते खोदाई आणि खोदलेले रस्त्यांची डागडुजी करून रस्ते पूर्ववत करण्याची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी दिल्या. ७ जूननंतर एकही काम अपूर्ण राहणार नाही,’ याची दक्षता घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
रस्त्यांची कामे करताना दर्जा खराब असल्यास महापालिकेचे नुकसान होते. ठेकेदार काम केल्यानंतर पैसे घेऊन निघून जातो. त्यामुळे रस्ता खराब झाल्यानंतर पालिकेला त्याची दुरुस्ती करावी लागते. हे टाळण्यासाठी पावसाळा संपल्यानंतर ठेकेदाराला पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. – ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका