पुणे : ‘महापालिकेच्या मिळकतकर विभागासाठी नवीन संगणक प्रणाली तयार करण्याचे काम कोणत्याही निविदेशिवाय देण्यात आले आहे. या कामासाठी ‘सीएसआर’च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘आयसीआयसीआय बँके’ने हे काम ‘इनोव्हर सिस्टीम’ या कंपनीला दिले. या कंपनीची निवड चुकीच्या गुणांकनाद्वारे केल्याने ही यंत्रणा अद्यापही कार्यान्वित झाली नाही. हे काम रद्द करून नवीन निविदा काढावी,’ अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी केली.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निकम यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, ‘महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांच्या हातात संपूर्ण कारभार असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासक काळात ‘सीएसआर’च्या माध्यमातून मिळकतकर विभागाचे नवीन सॉफ्टवेअर आणि ‘डाटा मायग्रेशन’चे काम देण्यात आले. मात्र, यात अनेक चुकीच्या गोष्टी समोर येत आहेत.

‘आयसीआयसीआय बँके’ने ‘सीएसआर’च्या माध्यमातून ही नवीन संगणक प्रणाली तयार करण्यासाठी तयारी दर्शविली. या कामासाठी पाच कंपन्यांना सादरीकरण करण्यासाठी बोलाविण्यात आले. वीस मुद्द्यांच्या आधारे गुणांकन करून सर्वाधिक गुण असलेल्या ‘इनोव्हर’ या कंपनीची निवड करण्यात आली. या कंपनीला २०० पैकी १९१ गुण देण्यात आले. उर्वरीत कंपन्यांना १४० ते १५० दरम्यान गुण देण्यात आले.

मिळकतकर विभागाकडील डाटा मायग्रेट करणे आणि संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी चार महिन्यांचे उद्दिष्ट देण्यात आले. प्रत्यक्षात दीड वर्ष उलटूनही संगणक प्रणाली तयार झाली नाही. कराराचा भंग झाला आहे. या प्रकल्पासाठी ‘इनोव्हर’ कंपनीने कोणतेही मनुष्यबळ पुरविलेले नाही.’ त्यामुळे हे काम रखडले आहे.

‘पुणे महापालिका आणि बँकेच्या करारानुसार ‘सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट’ची नेमणूक करण्याची जबाबदारी कंपनीची होती. तसेच, करारानुसार डेटा सेंटर, होस्टिंग सेवा, प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य पुरविण्यात आले आहे का, याचीही चौकशी करावी. बँकेने संबधित कंपनीबरोबर केलेला करार महापालिकेच्या हिताचा नसल्याचे आढळल्यास तो रद्द करून या कामासाठी फेरनिविदा काढावी,’ अशी मागणी निकम यांनी केली आहे.

प्रशासन काळ अन् चुकीचे निर्णय

महापालिकेच्या निवडणुका लांबल्याने राज्य सरकारने महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती दिला होता. महापालिका आयुक्त हेच प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. या काळात महापालिकेचे सभागृह अस्तित्वात नसल्याने लोकप्रतिनिधी यांचा हस्तक्षेप नव्हता. प्रशासनाच्या काळात अधिकाऱ्यांना योग्य वाटेल त्याच पद्धतीने कामे देण्यात आली आहेत. दिलेली कामे मुदतीत पूर्ण होतात की नाही याकडेही प्रशासनाचे लक्ष नसल्याने बहुतांश कामे रखडत असल्याचे समोर आले आहे. प्रशासकीय काळात नियमांना हरताळ असून अनेक कामे दिल्याचे आता समोर येत आहे.