पुणे : शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका शहरातील विकासकामांना बसू लागला आहे. निविदा प्रक्रिया राबवता येत नसल्याने अनेक नवीन प्रकल्प रखडले आहेत. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आचारसंहितेच्या काळात विकासकामे रखडणार नाहीत, अशी ग्वाही दिली होती. आता त्यांनीच नवीन कामे हाती घेऊ नयेत, केवळ देखभाल व दुरुस्तीची कामे करावीत, असा निर्णय घेतला असून, यामुळे पथ विभागाची २६५ कामे, तर प्रकल्प विभागाकडील अनेक महत्त्वाचे प्रकल्प लांबणीवर पडले आहेत.
शिक्षक व पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता २२ सप्टेंबरपासून लागू झाली असून, ती २७ ऑक्टोबरपर्यंत असेल. या काळात विकासकामे थांबू नयेत, यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन कामे करू, अशी जाहीर भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली होती. मात्र, पुणे महापालिकेची नवीन विकासकामे थांबविण्याचा आदेश खुद्द आयुक्तांनीच दिला आहे. याबाबत आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना परिपत्रक काढले आहे. त्यानुसार नवीन विकासकामे, नवीन कामांना प्रशासकीय अथवा तांत्रिक मान्यता देणे, नवीन निविदा प्रसिद्ध करणे अथवा निविदा प्रक्रियेतील पुढील कार्यवाही करता येणार नाही. अत्यावश्यक नागरी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली देखभाल व दुरुस्ती कामे हाती घ्यावीत. या कामांसाठीही अतिरिक्त आयुक्तांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
आचारसंहितेमुळे नवीन विकासकामांची निविदा प्रक्रिया ठप्प झाली आहे. याचा फटका प्रामुख्याने पथ विभागाला बसला आहे. पथ विभागाची एकूण ४९८ प्रस्तावित कामे आहेत. त्यातील २६५ कामे निविदा प्रक्रियेच्या टप्प्यावर होती. ती आता लांबणीवर पडली आहेत. पथ विभागाकडून नवीन कामांचे प्रस्तावही लेखा विभागाकडे पाठविण्यात आले होते. मात्र, आयुक्तांच्या आदेशाचे कारण देऊन हे प्रस्ताव स्वीकारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सर्वच नवीन कामांची निविदा प्रक्रिया सुमारे एक महिना लांबणीवर पडली आहे. सध्या केवळ देखभाल व दुरुस्तीची आवश्यक कामे केली जात आहेत, अशी माहिती पथ विभागातील सूत्रांनी दिली.
निविदा प्रक्रियेत अडकलेले मोठे प्रकल्प
- अंतर्गत वर्तुळाकार मार्ग
- शिवणे ते नांदेड सिटी पूल
- कात्रज प्राणिसंग्रहालयासमोरील भुयारी पादचारी मार्ग
- विविध रस्त्यांवरील नियोजित वाहनतळ
पथ विभागाचे प्रस्तावित प्रकल्प
एकूण प्रकल्प – ४९८
निविदा प्रक्रियेत रखडलेले प्रकल्प – २६५
निविदा प्रक्रियेला स्थगिती
आचारसंहितेमुळे नवीन विकासकामांच्या निविदा प्रक्रियेला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. देखभाल व दुरुस्तीची आवश्यक कामे अतिरिक्त आयुक्तांच्या परवानगीने हाती घेण्यात येणार आहेत. प्रस्तावित विकासकामे आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लावण्यात येतील, असे पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी स्पष्ट केले.
सध्या सुरु असलेली केवळ कामे
आचारसंहितेमुळे नवीन कामे सध्या हाती घेण्यात येत नाहीत. निविदा प्रक्रिया राबवता येत नसल्याने ही कामे लांबणीवर पडली आहेत. सद्य:स्थितीत केवळ सुरू असलेली कामे पुढे सुरू ठेवण्यात येत आहेत. नवीन कामांची निविदा प्रक्रिया आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होईल. त्यानंतर या कामांना गती मिळेल, असे प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले.
