पुणे : महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुणे महापालिकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात शाळा सुरू करण्यात आले आहेत. या शाळांमध्ये गरीब आणि झोपडपट्टी मध्ये राहणारी मुले प्रामुख्याने शिक्षणासाठी येतात.

शहरातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महापालिका प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे वर्षाला हजारो रुपयांचा निधी खर्च करते. दरवर्षी कोट्यावधीने रूपांच्या निधी खर्च करू नये महापालिका शाळेतील गुणवत्ता सुधारत नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये आता महापौर लक्ष घालणार आहेत. महापाैर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला जाणार आहे. या अभ्यास गटाकडून येणाऱ्या सूचनेनुसार महापालिकेच्या इतर शाळांत त्याची अंमलबजावणी केली जाईल.

महापौरांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या गटात शिक्षणातील तज्ज्ञ असणार आहेत. हा अभ्यास गट शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात अहवाल सादर करणार असल्याचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालविणाऱ्या ‘आकांक्षा फाऊंडेशन’ या संस्थेला वर्षाला सुमारे बारा काेटी रुपये दिले जाणार आहेत. पुढील तीन वर्षांसाठी या संस्थेबरोबर करार केला जाणार असल्याचे बीडकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यम शाळा पुढील नऊ वर्षांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासनाने पुढे आणला होता. यासाठी सुमारे १०१.२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा प्रस्ताव शिक्षण समितीसमोर न आणता थेट स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. त्यामुळे स्थायी समितीने या प्रस्तावावर फेरविचार करून शिक्षण समितीच्या मार्फत हा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.

यावर सभागृह नेते बीडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमवारी भूमिका मांडली. बीडकर म्हणाले, ‘संबंधित संस्थेला महापालिकेच्या शाळा नऊ वर्षासाठी नव्हे, तर तीन वर्षांसाठी चालविण्यासाठी दिल्या जाणार आहेत. यापूर्वी ही संस्था ‘सीएसआर’च्या निधीतून महापालिकेच्या शाळा चालवीत होती. सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.

‘सीएसआर’मधून हा खर्च परवडत नसल्याने महापालिकेने यासाठी वाटा उचलावा, अशी मागणी केली जात होती. संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली असून, उत्तीर्ण हाेण्याचे प्रमाण हे ९० टक्के इतके आहे. विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी झाले आहे.’