पुणे : महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करता यावी, यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेच्या माध्यमातून ५९ हजार ७९५ विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यांवर महापालिकेने आत्तापर्यंत २२ कोटी ९८ लाख रुपये जमा केले आहेत. या निधीतून पालकांनी तातडीने शालेय साहित्य खरेदी करावे, असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे.

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने दर वर्षी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी निधी दिला जातो. संबंधित लाभार्थी किंवा त्याच्या पालकांच्या बँक खात्यावर ही रक्कम महापालिकेकडून जमा केली जाते. आतापर्यंत महापालिकेने ५९ हजार ७९५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सुमारे २३ कोटी रुपयांची रक्कम जमा केल्याची माहिती भिमाले यांनी दिली.

‘बालवाडी तसेच इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी तसेच महापालिकेच्या शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ज्या विद्यार्थ्यांचा यू-डायस प्रणालीवरील कायमस्वरूपी विद्यार्थी नोंदणी क्रमांक तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यांचा कायमस्वरुपी क्रमांक मिळताच ‘डीबीटी’द्वारे निधी हस्तांतरित करण्यात येईल. तसेच, माध्यमिक विभागातील सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांसाठी ‘डीबीटी’ची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५ ऑगस्टपूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे,’ असे भिमाले यांनी सांगितले.

महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी महापालिका पैसे देते. यासाठी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात दरवर्षी तरतूद केली जाते. काही वर्षांपूर्वी महापालिका या शालेय वस्तूंची खरेदी करून त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करत होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित्ता होत असल्याचे आरोप झाल्याने तसेच खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन थेट संबंधित लाभार्थी किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यावर डीबीटी च्या माध्यमातून शालेय साहित्यांची खरेदी करण्यासाठी रक्कम जमा करते.

महापालिकेने जमा केलेला मिथुन आवश्यक असलेल्या शालेय साहित्याची खरेदी पालकांना करता येते. यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असलेले साहित्य घेता येते. थेट डीबीटीची रक्कम बँक खात्यात जमा होत असल्याने त्यामध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप होत नाहीत. शाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यातच विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यावर महापालिकेच्या वतीने टीबीटीचे रक्कम वर्ग केले जाते. मात्र यंदाच्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणार असलेल्या सभासदाच्या निवडणुकीचे आचारसंहिता सुरू असल्याने यासाठी विलंब झाल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.