पुणे : पावसाळापूर्व कामे करताना नालेसफाई, कल्व्हर्टच्या कामात अनियमितता आढळल्याने दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांसह सहा जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी ही कारवाई केली आहे.
विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय, कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. येत्या आठवड्यापासून विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील नाले व कल्व्हर्टच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, कामांच्या गुणवत्तेची व प्रगतीची तपासणी केली जाईल, अशी माहितीही अतिरिक्त आयुक्त नायर यांनी दिली.
शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाई, कल्व्हर्ट व जलनि:स्सारण व्यवस्थेशी संबंधित विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त नायर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सर्व परिमंडळ उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. परिमंडळ उपायुक्त माधव जगताप, विजयकुमार थोरात, अविनाश सकपाळ, अरविंद माळी,अविनाश सकपाळ,उपायुक्त आशा राऊत, आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त गणेश सोनुने सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यात आला. नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणे, कल्व्हर्ट दुरुस्ती व बांधकाम, जलनि:सारण व्यवस्थेची क्षमता वाढविणे, पूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कामांचा परिमंडळनिहाय सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीमध्ये पुढील आठवड्यापासून शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून जे नाले, पावसाळी गटारे जात आहेत. त्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे.
महापालिकेच्या प्रशासनाने ज्या ठेकेदाराला नाले स्वच्छता तसेच पावसाळी गटाऱ्यांच्या स्वच्छतेचे काम दिले होते ते काम संबंधित व्यक्तीने व्यवस्थित केले आहे का? महापालिकेच्या विभाग प्रमुखांनी त्याची पाहणी केली आहे का. झालेल्या कामाचा दर्जा, गुणवत्ता पालिकेच्या अधिकाऱ्याने तपासली आहे का? अशा सर्व गोष्टींची माहिती घेतली जाणार असल्याचे नायर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कसबा तसेच विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून जाणाऱ्या नाल्यांची तसेच कल्व्हर्टच्या कामांची महापालिकेच्या वतीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली. यामध्ये अनेक त्रुटी आढळल्याने या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी असलेल्या सहाय्यक आयुक्तांसह उपअभियंता, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक अशा सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर म्हणाले, शहरात मान्सूनपूर्व कामे गतीने पूर्ण करावीत. प्रत्यक्ष पाहणी करून आढळून येणाऱ्या त्रुटी तातडीने दूर कराव्यात. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
