पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रेखा टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे मुरलीधर मोहोळ आणि सुनील कांबळे यांची नावे चर्चेत होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. तर आघाडीकडून रेखा टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. भाजपचे स्थायी समितीमधील संख्याबळ लक्षात घेता मोहोळ विजयी होणार हे निश्चित मानले जात होते. तर आज झालेल्या या निवडणुकीवेळी आघाडीच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी माघार घेतली. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांनी बिनविरोध निवड झाली.
पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने येत्या काळात स्थायी समितीच्या माध्यमातून काम करणार आहे. सर्व पक्षांना बरोबर घेऊन काम करणार आहे. त्याचबरोबर पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडणार असे नवनिर्वाचित अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

तत्पूर्वी, निवडणुकीवेळी पीठासीन आधिकारी आणि अपंग कल्याणकारी आयुक्त नितीन पाटील, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आदी उपस्थित होते.