पुणे : शहरातील सर्व पथारी व्यावसायिकांची पोलीस पडताळणी करून त्यांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. पात्र व्यावसायिकांना बारकोड, क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्यात येणार असून, त्याद्वारे त्यांना अधिकृत परवाना (लायसन्स) मिळणार आहे. शहरातील पथारी व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

शहरातील पथारी व्यावसायिकांना शिस्तबद्ध व कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये सुसूत्रता येणार आहे. पथारी व्यावसायिकांना क्यूआर कोड असलेले ओळखपत्र दिले जाणार असल्याने त्यामध्ये संबंधित व्यावसायिकाची संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे.

व्यवसायाचा प्रकार, परवानगीची जागा यांची माहिती यामध्ये असणार आहे. यामुळे शहरातील बेकायदा पथारी व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. तसेच, यामुळे अधिकृत व्यावसायिकांना संरक्षण मिळणार आहे. बेकायदा पथारी व्यावसायिकांची माहिती समोर येणार असल्याने शहरातील वाहतूक व सार्वजनिक व्यवस्थापन अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शहरातील पथारी व्यावसायिक आणि महापौर नागपुरे यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली. या वेळी पथारी व्यावसायिकांच्या संघटनांनी रस्त्यावर कचरा न टाकणे, स्वच्छता राखणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आणि प्रशासनास सहकार्य करणे याबाबत महापालिकेला लेखी हमी दिली आहे.

या बैठकीत चर्चा झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना महापौरांनी संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांना दिल्या. त्यामुळे शहरातील पथारी व्यवसाय अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि नियमनबद्ध करण्याचा यामागील मुख्य उद्देश असल्याचे महापौर नागपुरे यांनी स्पष्ट केले.

पथारी व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने २०१४ मध्ये फेरीवाला धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या आधारे शहरातील विविध रस्त्यांवर वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी महापालिकेने परवाना दिला आहे. यामध्ये प्रत्येक पथारी व्यावसायिकाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’ या श्रेणीनुसार परवाना देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या सर्वेक्षणात २३ हजार जणांची नोंद

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात २३ हजार १६६ जणांची नोंदणी केली आहे. त्यापैकी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतमध्ये सुमारे १२ हजार १५५ जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. शहरातील ५२५ झोनमध्ये हे पुनर्वसन झाले आहे. काही परवानाधारक पथारी व्यावसायिक कोठेच व्यवसाय करत नसल्याचे समोर आले होते. त्यांची चौकशी, तपासणी करून महापालिकेने त्यांचे परवाने रद्द केले आहेत. तर अनेक पथारी व्यावसायिकांकडे महापालिकेची थकबाकी प्रलंबित असल्याचेही समोर आले आहे. त्यांनाही महापालिकेने थकबाकी भरा अन्यथा परवाने रद्द केले जातील, असा इशारा दिला आहे. पथारी व्यावसायिकांकडे असलेली थकबाकी ६६ कोटींपर्यंत गेली होती.