पुणे : राज्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (१०वी आणि १२ वी) परिक्षांर्थींच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) परिक्षा काळात विशेष सुविधा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे परीक्षांर्थींना परीक्षा केंद्रापर्यंत विना अडथळा सुलभ आणि वेळेत प्रवास करता येणार आहे.
शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार उच्च माध्यमिक (१२ वी) परीक्षा आजपासून (१० फेब्रुवारी) सुरूवात होणार आहे. तसेच शुक्रवारपासून (२० फेब्रुवारी) शालांत परीक्षेला (१०वी) सुरुवात होणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहचता यावे, वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, परीक्षेपूर्वी धावपळ होऊ नये म्हणून पीएमपी प्रशासनाने मार्गिकांवरील संचलनाच्या बसचे नियोजन केले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले असून वाहक आणि चालकांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पीएमपी महामंडळाकडून देण्यात आली.
अनेकदा पासची वैधता संपुष्टात आल्याने किंवा गर्दीमुळे प्रवासाला मुकण्याचे प्रकार घडतात. दुसऱ्या बसची प्रतीक्षा करेपर्यंत कालावधी वाया जात असून परीक्षा केंद्रावर पोहचण्यास विलंब होतो. हे प्रकार टाळून परीक्षेपूर्वी परीक्षार्थीला विनात्रास परीक्षा केंद्रावर पोहचविण्यासाटी पीएमपी प्रशासनाने यंदाच्या वर्षी नियोजन केले आहे. त्यानुसार पास धारक विद्यार्थ्यांना देखील निवास स्थान ते परीक्षाकेंद्रापर्यंतचे पास पूर्णपणे वैध राहतील. कालावधी संपला असल्यास, विद्यार्थ्या्ंची अडवणूक केली जाणार नसून या काळात वेगळे तिकीट घेण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अनेकदा बस थांब्यांवर स्थानकांवर इतर प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे परीक्षांर्थींच्या मदतीसाठी स्वतंत्र अधिकारी आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना अडचण आल्यास तातडीने पर्यायी बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असून याबरोबर अनेक सुविधाही देऊ करण्यात येणार असल्याचे पीएमपी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पीएमपीकडून देण्यात आलेल्या सुविधा
- निवासस्थान ते परीक्षा केंद्र पास वैध राहणार
- मर्यादा संपल्यास तिकीट काढण्याची गरज नाही
- परीक्षार्थींना बसच्या पुढील दारातून प्रवेशाची मुभा
- प्राधान्यक्रमानुसार परीक्षांर्थींना बस उपलब्धता
- शाळा व्यवस्थापनाकडून विनंती आल्यास अतिरिक्त सेवा
- गर्दीच्या थांब्यांवर अधिकारी, पर्यवेक्षक नियुक्ती
परीक्षाकाळात वेळेची बचत होऊन विद्यार्थ्यांना शांतपणे परीक्षेची तयारी करात यावी, परीक्षा केंद्रावर सुलभ पोहचता यावे या उद्देशाने पीएमपी प्रशासनाकून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परीक्षार्थी आणि पालकांनी जास्तीजास्त या सेवेचा लाभ घ्यावा. – किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी महामंडळ
