पुणे : पीएमपी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुकानात शिरल्याची घटना आप्पा बळवंत चौकात मंगळवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले. अपघातात चार दुचाकी, तसेच लग्नपत्रिका दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. वडगाव बुद्रुक ते पुणे स्टेशन या मार्गावरील पीएमपी बस मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आप्पा बळवंत चौकातून निघाली होती.
त्या वेळी बसचालकाचे अचानक नियंत्रण सुटले. बस रस्त्यावरील एका लग्नपत्रिका दुकानावर आदळली. त्या वेळी दुकानाच्या परिसरात ग्राहक नव्हते. दुकानााबाहेर लावलेल्या दोन दुचाकींना बसने धडक दिली. बसच्या धडकेत दुकानाच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. दुकानातील साहित्य, तसेच फर्निचरचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पीएमपी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. बसचालकाचे नियंत्रण कसे सुटले, तसेच पीएमपी बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का ? यादृष्टीने पीएमपी प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार आहे. दुकानात ग्राहक नव्हते. त्यामुळे गंभीर दुर्घटना टळली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
