पुणे : पीमपी बसने अचानक पेट घेतल्याची घटना शिवाजीनगर भागात शुक्रवारी सकाळी घडली. रात्रपाळीहून घरी निघालेले अग्निशामक दलाचे जवान सुरेश पवार यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
पुणे स्टेशन ते निगडी या मार्गावरील पीएमपी बस शिवाजीनगर परिसरातून निघाली होती. अचानक पीएमपी बसने पेट घेतला. अग्निशामक दलाच्या कसबा पेठ केंद्रातील जवान सुरेश पवार हे पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात राहायला आहेत. रात्रपाळीहून जवान पवार हे दुचाकीवरुन घरी निघाले होते. पीएमपी बसमधून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे पवार यांनी पाहिले. पवार यांनी तातडीने या घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कळविली. अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पाेहोचेपर्यंत पवार यांनी तत्परता दाखविली. प्रसंगावधान राखून त्यांनी बसमधील वाहक, चालकासह सर्व प्रवाशांना खाली उतरविले. अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
जवान पवार यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. पीएमपी प्रवाशांनी जवान पवार यांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक केले.
