पुणे : पीएमपी बस प्रवासात उलटीचा बहाणा करुन एका महिला प्रवाशाच्या पिशवीतून सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोररून पसार झालेल्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली. पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी परिसरात नुकतीच ही घटना घडली होती.
ननिता दिनेश कांबळे (वय ३७, सध्या रा. विश्रांतवाडी, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक करण्यात अलोल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला ३० मार्च रोजी हडपसर गाडीतळ ते चिंचवड या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होती. त्या वेळी शेजारी थांबलेल्या कांबळेने प्रवासात उलटी आल्याचा बहाणा केला. तक्रारदार महिलेचे लक्ष विचलित केले. तिचे लक्ष नसल्याची संधी साधून कांबळे तक्रारदार महिलेच्या पिशवीतून सात लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले होते. दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यानंतर वानवडी पोलिसांनी तपास सुरू केला. हडपसरमध्ये शिंदे वस्ती परिसरात एक महिला थांबली असून, ती दागिने विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विष्णू सुतार आणि अमोल गायकवाड यांना मिलाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिला ताब्यात घेतले.
तिच्याकडून सहा लाख ९० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. चौकशीत तिने पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विठ्ठल चोमले, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण, आशिष कांबळे यांनी ही कारवाई केली.
ओैंध रस्ता परिसरात भरदिवसा घरफोडी
ओैंध रस्ता परिसरात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून साडेचार लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादार तरुण ओैंध रस्त्यावरील श्री चेतन सोसायटीत राहायला आहे. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ते कुटुंबीयासोबत कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्याने कपाटातील साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत. शहर परिसात गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत.
दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील १६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार माने तपास करत आहेत.
