पुणे : शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) गुणवत्ता परिषदेने (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया- क्यूसीआय) केलेल्या अंतिम मूल्यांकनामध्ये शंभर पैकी ७६ गुण मिळाले असून, राज्यात ‘पीएमआरडीए’ला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
पहिल्या क्रमांकावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ८२.१६ गुणांसह प्रथम, तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने ७७.१९ गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण चौथ्या, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाचव्या स्थानी आहे. मुख्यमंत्री – शंभर दिवस कृती आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यातील विशेष उपक्रमात ‘पीएमआरडीए’सह राज्यातील ९५ महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय आणि निमशासकीय संस्था, कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. ‘क्यूसीआय’च्या पथकाने दहा महत्त्वाच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मूल्यमापन केले होते. सर्वसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून दिलेल्या सोयी-सुविधा आणि प्रशासकीय कामकाजातील गतिमानतेच्या आधारावर ‘पीएमआरडीए’ला तिसरा क्रमांक देण्यात आला.
संकेतस्थळ, केंद्र शासनाशी सुसंवाद, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी-सुविधा, कामकाजातील सुधारणा, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी, न्यायालयीन बाबी, कृत्रिम प्रज्ञेचा वापर, आर्थिक आणि औद्योगिक गुंतवणुकीस प्राेत्साहन, सुकर जीवनमान या निकषांच्या आधारावर हे मूल्यमापन करण्यात आले.
प्रशासकीय कामकाजात अपेक्षित गतिमानतेच्या आधारावर ‘पीएमआरडीए’ला यश मिळाले आहे. यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. आगामी काळात सोयी-सुविधा, प्रशासकीय सेवा आणखी लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असेल,’ असे ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डाॅ. योगेश म्हसे म्हणाले.