scorecardresearch

पुणे पोलिसांची कमाल; चोरीला गेलेले मोबाईल केरळ, कर्नाटक आंध्रमधून शोधून आणले

चोरीला गेलेले फोन पुणे पोलिसांनी परराज्यातून शोधून आणले आहेत.

Polce traced mobile phones
चोरीला गेलेले फोन पुणे पोलिसांनी परराज्यातून शोधून आणले आहेत.

पुणे शहर पोलिसांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. शहरातल्या नागरिकांचे चोरीला गेलेले फोन त्यांनी शोधून आणले आहेत. विशेष म्हणजे हे फोन महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये सापडले. यासाठी या तिन्ही राज्यांमधल्या पोलिसांची मदत मिळाली. शोधून आणलेले हे फोन संबंधित नागरिकांना (ज्या नागरिकांनी फोन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केले होती) परत केले आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बहुतांश लोक फोनशिवाय एक दिवस देखील राहू शकत नाहीत. परंतु या फोनवर चोरांची नजर असते. कधी ट्रेन, बस प्रवासात तर कधी घरातून फोन चोरीला गेल्याच्या घटना सर्रास घडतात. त्यानंतर काही नागरिक फोन चोरीला गेल्याची तक्रार करतात. तर काहीजण तक्रर करत नाहीत. कारण एकदा चोरीला गेलेला फोन परत मिळण्याची शक्यता तशी खूपच कमी आहे. परंतु पुण्यातल्या काही नागरिकांना मात्र त्यांचा चोरीला गेलेला फोन परत मिळाला आहे. आपला फोन परत मिळाल्याने या नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नही.

पोलिसांनी या तपासाबद्दल एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर सेलने मोबाईल फोन चोरील्या गेल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक व त्यांच्या पथकातील आदेश चलवादी व रुचिका जमदाडे यांनी या चोऱ्यांचा तांत्रिक तपास केला असता त्यांना माहिती मिळाली की, त्यांच्याकडे तक्रारी प्राप्त झालेले काही फोन केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागात वापरले जात आहेत.

१५ फोन शोधण्यात पोलिसांना यश

पोलिसांनी चोरीला गेलेले फोन जे लोक वापरत आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तपास केल्यानंतर चोरीला गेलेले १५ फोन शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. पुणे पोलिसांनी यासाठी तिन्ही राज्यांमधल्या पोलिसांची मदत घेतली.

हे ही वाचा >> कसब्यात ८० वर्षांपुढील १९ हजार मतदार, ४९ जणांची टपाली मतदानासाठी नोंदणी

नागरिकांना ऑनलाईन तक्रार करण्याचं आवाहन

या तपासाबद्दल माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले की, नागरिक त्यांच्या हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलसंदर्भात ऑनलाईन तक्रार करू शकतात. पुणे शहर पोलिसांच्या वेबसाईटवर किंवा सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलवर नागरिकांनी त्वरित तक्रारी नोंदवाव्यात.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 11:06 IST