पुणे : होळी, तसेच धुळवडीच्या दिवशी मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्या दुचाकीस्वार, तसेच मोटार चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मद्यपी वाहन चालकांविरुद्ध पोलिसांनी नाकाबंदी करुन विशेष कारवाई (ड्रंक अँड ड्राईव्ह) केली. या कारवाईत पोलिसांनी ४५५ मद्यपी वाहनचालकांना पकडले. त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करुन खटले दाखल करण्यात आले.

होळी, धुळवडीला शहराच्या विविध भागात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अनेक जण मद्य प्राशन करुन वाहने चालवितात. मद्यपी वाहन चालकांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. होळी आणि धुळवडीच्या दिवशी शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांनी नाकाबंदी केली. मंगळवारी (३ फेब्रुवारी) वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, महामार्ग, तसेच गर्दीच्या ३० ठिकाणी नाकाबंदी केली. पोलिसांनी लोखंडी कठडे लावून (बॅरिकेड्स) तपासणी केली.

पोलिसांनी वाहन चालकांनी ब्रीथ ऑनलायजर यंत्राच्या सहायाने तपासणी केली. तपासणीत ४५५ वाहन चालकांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

मद्यपी वाहनचालकांचे समुपदेशन

मद्यप्राशन केलेल्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांना बुधवारी (४ फेब्रुवारी) येरवडा येथील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात बोलाविण्यात आले. वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले. मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, यादृष्टीने न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र केली. गेल्या वर्षी शहरात पाच हजारांहून जास्त मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. यापुढील काळात मद्यपी वाहनचालकांविरुद्ध नियमित कारवाई करण्यात येणार आहे.