पुणे : भाडेकरुंची माहिती न देणारे घरमालक, तसेच खासगी वसतिगृह चालकांविरुद्ध (पीजी) पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भाडेकरुंची माहिती न दिल्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. शहरात अनेक जण नोकरी, व्यवसाय, तसेच शिक्षणासाठी स्थायिक झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था, गंभीर स्वरुपांच्या गु्न्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शहरात वास्तव्यासाठी आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करणे गरजेचे आहे.
अनेक जण शहरात भाडेतत्त्वावर सदनिका, बैठ्या चाळीतील घरे भाड्याने घेऊन राहत आहेत. परगावाहून शिक्षण, तसेच नोकरीसाठी येणारे अनेक जण खासगी वसतिगृहात (पीजी) राहत आहेत. भाडेतत्त्वावर शहरात राहणाऱ्यांची माहिती घरमालकांनी पोलिसांना कळविणे बंधनकारक आहे. याबाबत पोलिसांनी घरमालकांना आवाहन केले होते. घरमालकांची माहिती न देणाऱ्या कारवाईसाठी विशेष शाखेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत स्थानिक पोलीस ठाण्यातील पथके सहभागी झाली आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही माेहीम राबविण्यात येत आहे.
पुणे पोलिसांच्या सात परिमंडळातील पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाडेकरार न करणे, तसेच संबंधित माहिती पोलिसांना न दिल्या प्रकरणी घरमालकांविरुद्ध भारतीय नागरिक संहिता सुरक्षा कलम १६३ चे उल्लंघन करणे, तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी कोथरूड, डेक्कन जिमखाना, आंबेगाव, नऱ्हे, चतु:शृंगी, खडकी, लोणीकंद, लोणी काळभोर भागातील १२३ घरमालकांविरुद्ध कारवाई केली. यापुढील काळात ही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
भाडेकरार करताना ‘आयजीआर’ (आय-सरिता) प्रणालीत नागरिकांनी भरलेली माहिती सीसीटीएनस संगणकीय प्रणालीद्वारे पुणे पोलिसांना उपलब्ध होते, तसेच पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर ही माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. घरमालक जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन ही माहिती देऊ शकतात.
