पुणे : फटाक्यासारखे आवाज काढणारे सायलेन्सर बसवून ध्वनीप्रदुषण करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या दोन हजार ८२२ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी बुलेटला बसविलेले ९०० सायलेन्सर काढून टाकले. येरवड्यातील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात बुधवारी ९०० सायलेन्सरवर बुलडोझर चालविण्यात आले.
‘शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बुलेटला फटाक्यासारखे आवाज काढणारे सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज काढला जात असल्यच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालय, रुग्णालयाच्या परिसरात अशा प्रकारचे आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक विशेषत : ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास व्हायचा. वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कर्णकर्कश हाॅर्नचा वापर करणारे दुचाकीस्वार, तसेच फटाक्यासारखे आवाज काढणारे बुलेटस्वारांविरुद्ध कारवाई केली’, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील उपस्थित होते.
‘या मोहिमेत पोलिसांनी एकुण दोन हजार ८२२ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. बुलेटला बसविण्यात आलेले सायलेन्सर (माॅडीफाय) जागेवरच जप्त करण्यात आले. या कारवाईत २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, डेक्कन जिमखाना, भारती विद्यापीठ भागात अशा प्रकारचे सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अशा प्रकारचा पहिला गुन्हा केल्यास त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केल्यास दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात बुलढोझर चालवून जप्त केलेले सायलेन्सर नष्ट करण्यात आले,’, असे अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी नमूद केले.
फटाक्यासारखे आवाज काढणारे सायलेन्सर, तसेच कर्णकर्कश हाॅर्नचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध यापुढील काळात नियमित कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे – मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त
गॅरेज चालकांविरुद्ध गुन्हे
सायलेन्सरमध्ये फेरफार (माॅडीफाय) करुन देणाऱ्या गॅरेज चालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. अशा गॅरेज चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला.
बेशिस्तांविरुद्धची कारवाई
कारवाई केलेली वाहने – दोन हजार ८२२
जप्त केलेले सायलेन्सर – ९००
एकूण दंड आकारणी – २८ लाख १७ हजार रुपये
