पुणे : धोकादायक पद्धतीने उघड्यावर गॅस शेगडीचा वापर करुन खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या ४० विक्रेत्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हे दाखल केले. नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता), डेक्कन जिमखाना, तसेच कर्वे रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली.

डेक्कन जिमखाना भाग वर्दळीचा ‌भाग आहे. रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने शेगडी पेटवून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. वडापाव, अंडा भुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांची विक्री केली जात होती. या भागात विद्यार्थी, तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. वर्दळीच्या ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर करुन खाद्यपदार्थ तयार करुन त्याची विक्री केली जात होती. पोलिसांनी या भागातील खाद्यपदार्थ विक्रेते, तसेच बेकायदा पथारी मांडून व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.

पोलिसांनी ४० टपरीधारकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. ‘पदपथांवर धोकादायक पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई केली आहे. बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध नियमित कारवाई करण्यात येणार आहे’, असे डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले.

शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात महिला वकिलांमध्ये हाणामारी

शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयाच्या आवारात दोन महिला वकिलांमध्ये वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत एका महिला वकिलाच्या डोक्यात अणकुचीदार वस्तूने मार लागल्याने त्या जखमी झाल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४२ वर्षीय वकील महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वकील भवानी पेठेत राहायला आहेत. गेल्या दीड वर्षांपासून शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात वकिली करत आहेत.

न्यायालयीन प्रकरणे जास्त प्रमाणात मिळत असल्यच्या कारणावरुन फिर्यादी महिला वकील आणि आरोपी महिला वकिलामध्ये वाद झाले होते. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी त्या न्यायालयात कामासाठी आल्या होत्या. त्या वेळी दोन वकिलांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुपारी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. फिर्यादी महिला वकील न्यायालयाबाहेर पडत होत्या. त्या वेळी एका आरोपी वकील महिलेने महिला वकिलाला ठोसा मारला. त्यानंतर दोघींमध्ये झटापट झाली.

झटापटीत एका महिला वकिलाने अणकुचीदार वस्तूने मारहाण केली. फिर्यादी वकील महिलेच्या डोक्याला जखम झाली. रक्तस्त्राव झाल्याने त्यांना चक्कर आली. न्यायालयातील वकिलांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. ‘या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे’. अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीष दिघावकर यांनी दिली.