पुणे : विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करून आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. पोलिसांनी विसर्जन मार्गावरील एक हजार २२४ मंडळांची ध्वनिमापन यंत्राद्वारे (नाॅईज मीटर) तपासणी केली आहे. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांना पोलिसांकडून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यास सुरुवात झाली आहे.

विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धकांचा आवाज नियंत्रित ठेवावा, चार बास आणि चार टाॅपचा वापर करावा, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिल्या होत्या. या बाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांनी चार बार आणि चार टाॅपचा वापर केला. मात्र, आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे दिसले. अनेक मंडळांनी उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरली होती. पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या ध्वनिवर्धक यंत्रणेची ध्वनिमापन यंत्राद्वारे तपासणी केली.

तपासणीतील अहवालानुसार संबंधित मंडळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील सात परिमंडळांच्या पोलीस उपायुक्तांना कारवाईचे अधिकारी दिले आहे. त्यानुसार संबंधित मंडळांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. मंडळांचे स्पष्टीकरण आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.