पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने व्हॉट्सअॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा (sex racket) पर्दाफाश केलाय. या प्रकरणी छत्तीसगड आणि दिल्ली येथील ३ तरुणींची पोलिसांनी सुटका केली. जॅक, बबलू आणि करण या नावाच्या व्यक्तिंविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली.
आरोपींकडून एका रात्रीचे १३ हजार ते २० हजार रुपये दर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅक नावाचा व्यक्ती व्हॉट्सअॅपवरून सेक्स रॅकेट चालवत होता. तो ग्राहकांना तिन्ही तरुणींचे फोटो व्हाट्सअॅपने पाठवत असे. त्यापैकी आवडलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये पाठवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घ्यायचा. आरोपी तरुणींना एका रात्रीचे १३ हजार ते २० हजार रुपये, तर दिवसा एका तासाला ५ ते ९ हजार रुपये घ्यायला लावायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस कारवाईत दिल्ली आणि छत्तीसगडमधील ३ तरुणींची सुटका
व्हॉट्सअॅपवरून सेक्स रॅकेट चालत असल्याने मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. परंतु, बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सामाजिक सुरक्षा पथकाला यश आले. या पोलीस कारवाईत दिल्ली आणि छत्तीसगड येथील ३ तरुणींची सुटका पोलिसांनी केली.
हेही वाचा : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस, पाच तरुणींसह दलाल ताब्यात
या घटनेमुळे ऑनलाइन आणि व्हॉट्सअॅपवरील सेक्स रॅकेटचे मोठे जाळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरे, धैर्रशील सोळंके यांच्या पथकाने केली.