पुणे : वाहतूक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता श्री संत ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात रस्ते खोदाई करुन वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी खासगी गॅस पुरवठदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजीनगर भागातील श्री संत ज्ञानेश्वर पादुका चौकातून माॅडर्न महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर २७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास गॅस पुरवठादार कंपनीच्या ठेकेदाराने खोदाई सुरू केली. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने पालकही सकाळी परीक्षा केंद्रावर निघाले होते. या भागात शाळा, महाविद्यालय असल्याने कोंडी झाली. नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियोजन केले. वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर निघालेले नागरिक, तसेच पालकांना कोंडीत अडकून पडावे लागले होती.
पूर्वसूचना न देता अचानक गॅस पुरवठादार कंपनीने ठेकेदारामार्फत रस्ते खोदाई सुरू केल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. रस्ते खोदाई करण्यापूर्वी वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय, तसेच संबंधित भागातील वाहतूक विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, गॅस कंपनीने वाहतूक पोलिसांकडून परवानगी घेतली नसल्याने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
सांडपाणी नाल्यात सोडल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिका विरुद्ध गुन्हा
गृहप्रकल्पाच्या बांधकामा दरम्यान सांडपाणी नाल्यात सोडल्याप्रकरणी मुंढव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील केशवनगर भागात २०२४ पासून एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची निवास व्यवस्था (लेबर कॅम्प) करण्यात आली आहे. नियमानुसार सांडपाणी, तसेच स्वच्छतागृहातील पाण्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने बांधकामात वापरले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी, तसेच स्वच्छतागृहातील पाणी जवळच असलेल्या नाल्यात सोडल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.
गेल्या काही महिन्यांपासून या सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये डेंग्यू, मलेरिया, तसेच जलजन्य आजारांची भीती वाढली आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी तक्रारदाराने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनीक यांनी दिली.
