पुणे : येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात दहशत माजवून वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराइताची पोलिसांनी धिंड काढली. या प्रकरणी सराइताला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.सुलतान रिजवान शेख (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे शेख याच्याविरुद्ध गंभीर स्वरुापचे २२ गुन्हे दाखल आहेत. दहशत माजवण्यासाठी त्याने लक्ष्मीनगरमधील वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. त्यानंतर लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने त्याला पकडले.

सुलतान याने यापूर्वी वाहन तोडफोडीचे गुन्हे केले होते. त्याच्या दहशतीमुळे रहिवासी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास घाबरत होते. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची लक्ष्मीनगर परिसरातून धिंड काढली. सुलतान याने नागरिकांना धमकाविण्याचे गुन्हे केल्यास नागरिकांनी तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले.

पर्वतीत कोयते उगारून दहशत माजविणारे टोळके गजाआड

पर्वतीतील लक्ष्मीनगर भागात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली. टोळक्याकडून कोयते जप्त करण्यात आले.

प्रेम अर्जुन ढावरे (वय २०), किरण येडबा झोंबाडे (वय २१) पंकज सुभाष पवार (वय २१), आकाश चंद्रकांत गायकवाड (वय २२, सर्व रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती), किरण सुरेश कुर्ले (वय १९, रा. जनता वसाहत, पर्वती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी नानासाहेब खाडे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती भागातील शाहू वसाहतीत आरोपी ढावरे, झोंबाडे, पवार, गायकवाड, कुर्ले हे रविवारी ( १ मार्च) सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरुन आले. त्यांच्याकडे कोयते होते. रामराज्य मंडळाजवळ आरोपी दुचाकीवरुन उतरले. त्यांनी कोयते उगारून दहशत माजविली. नागरिकांनी शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करत आहेत.